संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात "सामंजस्य करार"
schedule02 Sep 25 person by visibility 241 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) विषयक सामंजस्य करार आज यशस्वीरित्या संपन्न झाला. या करारानिमित्त आयोजित तज्ञांनी सत्रात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्याचे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन करण्यात आले.
डॉ. मोहिनी सूर्यवंशी यांनी 'नवीन कल्पनेत नाविन्य आहे की नाही, हे कसे ओळखावे' याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी नवकल्पनांचे मूल्यमापन, संरक्षणाच्या पद्धतींवर तपशीलवार मार्गदर्शन केले.
या प्रसंगी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “आयपीआर" मुळे नाविन्यपूर्ण कल्पनांना संरक्षण मिळते. संशोधन, प्रकल्प व स्टार्टअप संस्कृतीला यामुळे चालना मिळते.” या करारामुळे संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना नाविन्यपूर्ण संशोधन, प्रकल्प विकास व बौद्धिक संपदा अधिकार विषयक मार्गदर्शन मिळणार असून उद्योग-शिक्षण यामध्ये भक्कम सेतू निर्माण होणार आहे. सत्रात इंपेलेक्स एम्पायरचे तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना पेटंट प्रक्रियेची माहिती दिली तसेच उद्योजकीय क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयसी संयोजक व आयपीआर सेलचे समन्वयक प्रा. मुझम्मिल बेपारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी राजनंदिनी पाटील, फिजा मोमीन यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डी. व्ही. कांबळे यांनी मानले. संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी या सामंजस्य करारास शुभेच्छा दिल्या आहेत.