शिवाजी विद्यापीठात ‘भारतीय विद्येचा परिचय’अभ्यासक्रम उत्साहात
schedule24 Jan 26 person by visibility 46 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्रामध्ये पीएम-उषा (PM-USHA) योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेला ‘भारतीय विद्येचा परिचय’ (An Introduction to Indology) हा पाच दिवसांचा बहुविद्याशाखीय मूल्यवर्धित अभ्यासक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. दिनांक १९ जानेवारी ते दिनांक २३ जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या अभ्यासक्रमामध्ये तज्ञांनी भारतीय विद्या, पुरातत्वशास्त्र आणि स्थानिक इतिहासाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
यामध्ये श्रीमती. सोनाली शाह यांनी भारतीय विद्येचा (Indology) उगम आणि जागतिक इतिहास मांडला, तर डॉ. योगेश प्रभुदेसाई यांनी पुरातत्वशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करत ब्रम्हपुरी येथील उत्खनन, करवीरमाहात्म्य संस्कृत ग्रंथ आणि प्राचीन ताम्रपटांच्या वाचनाद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. डॉ. तन्मय भोळे यांनी संस्कृत व प्राकृत मधील प्राचीन ग्रंथ संपदेचे महत्त्व विशद केले. त्याच जोडीला कु. योगिनी आत्रेय यांनी ब्राह्मी ते देवनागरी या लिपी प्रवासाचा मागोवा घेत विद्यार्थ्यांना ब्राह्मी लिपीचे प्राथमिक धडे दिले. डॉ. हर्षदा विरकुड यांनी विरगळींकडे पाहण्याचा नवा सांस्कृतिक व पुरातत्वीय दृष्टिकोन मांडला, तर मानसिंग चव्हाण यांनी भारतीय अध्ययन पद्धतीतून उलगडला मध्ययुगीन ते आधुनिक भारतीय विद्येचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरच्या इतिहासाचे सखोल विश्लेषण सादर केले.
या अभ्यासक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अभ्यासक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप, इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील, डॉ. दत्तात्रय मचाले, डॉ. उमाकांत हत्तीकट यांनी विशेष परिश्रम घेतले त्यास अध्ययन केंद्रातील सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.