कवी होण्याची पूर्वअट म्हणजे माणूस होणे : अजय कांडर; विद्यापीठातील ‘कविकट्टा’ झाला काव्यमय!
schedule24 Jan 26 person by visibility 45 categoryराज्य
कोल्हापूर: वर्तमानाला भिडण्याची ताकद आणि स्वत:ला चार पावले अधिक पुढे नेण्याची गोष्ट कवितेमुळे साध्य होते. यासाठी झब्बा, दाढी, शबनम, जाकीट अशा बाह्य उपचारांची काहीही गरज नसते. किंबहुना कवी हे मिरवण्याचे साधन नाही. तर तो भोवतालाचे दु:ख, मानवी वेदना किती तीव्रतेने मांडतो यावर त्या कवितेचे मूल्य ठरते. तर त्यासाठी आधी कवी होण्याची पूर्वअट म्हणजे माणूस होणे. असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभाग व बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
प्रमुख उपस्थितीत कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, चित्रकार संजय शेलार होते.
कांडर पुढे म्हणाले, कोणत्याही कलेचा इतिहास पाहता तो अस्वस्थतेला प्राधान्य देणारा आहे. माणूस प्रगती व भौतिक सुविधांनी शिखरावर जरी गेला तरी अंतिमत: माणूस म्हणूनच शाश्वतता उरते. त्यासाठी आधी भूमीचा तुकडा त्याच्या पायाशी असावा लागतो. यावेळी त्यांनी वर्तमानावर भाष्य करणारी ‘दगड कोण भिरकावतो’ ही सामाजिक जाणिवेची कविता सादर केली.
प्रा. चंद्रकांत पोतदार यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने हे काव्यसंमेलन रंगले. यावेळी शरयू आसोलकर (सावंतवाडी), इंद्रजीत घुले (मंगळवेढा), चंद्रकांत बाबर (आरग), कविता ननवरे (कोल्हापूर), विष्णू पावले (बत्तीस शिराळा) व मंदार पाटील (पन्हाळा) या कवींनी आपल्या कविता सादर केल्या. मराठी विभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, चित्रकार संजय शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभीचे सूत्रसंचालन ज्योती वराळे यांनी केले. आभार विश्वकोश मंडळाच्या संपादकीय सहायक डॉ. सुस्मिता खुटाळे यांनी मानले. यावेळी डॉ. धनंजय सुतार, डॉ. युवराज जाधव, कवी बबलू वडर, मतीन शेख, सोनाली जाधव, कवयित्री पूनम सावंत व मोठ्या संख्येने काव्यरसिक उपस्थित होते.