‘साऊंड सिस्टीम’ व ‘लेझर लाईट’ ला नकार देणाऱ्या ‘खंडोबा’ चा ‘शहरभान’ तर्फे मानपत्र देऊन सन्मान..!
schedule02 Sep 25 person by visibility 313 categoryसामाजिक

कोल्हापूर : येथील शिवाजी पेठेतील श्री खंडोबा तालीम मंडळाने यावर्षी गणेशोत्सवासाठी साऊंड सिस्टीम व लेझर लाईट यांचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. या समाजहिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करण्यासाठी कोल्हापूरातील ‘शहरभान’ या सामाजिक चळवळीतील नागरिकांनी त्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव केला. सोमवारी सायंकाळी खंडोबा तालीम मंडळात हा कार्यक्रम झाला.
यंदाच्या गणेशोत्सवात डीजे-डॉल्बी व लेझर लाईटचा वाढलेला वापर यामुळे जनसामान्य प्रचंड त्रस्त आहेत. अगोदरच शहरातील बिघडलेले रस्ते, खड्डे, व एकूणच सामाजिक गैरसोयी व असुविधा याविषयी लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. लोकं वैतागून गेलेली आहेत. अशामध्ये गणेशोत्सवात प्रत्येक मंडळाचा डीजे-डाॅल्बीसाठीचा अट्टाहास व त्यातून ध्वनीप्रदूषण करत राहणाऱ्या मिरवणूका, त्यातून रस्त्यावरील किंवा परिसरातील लोकांना होणारा आरोग्याचा त्रास आणि ही सगळी
वाढत चाललेली चुकीची प्रथा त्यामूळे तालीम मंडळांनी कुठंतरी या गोष्टी थांबवायला हव्यात अशी लोकभावना आहे.
अशा पार्श्वभूमीवर, शिवाजी पेठेतील एका अग्रगण्य खंडोबा तालीम मंडळाने लोकभावना लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या सुरवातीलाच हा निर्णय घेतला.
त्यावर ‘शहरभान’ या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या शहरातील विविध संस्थाच्या प्रतिनिधींनी यांची चांगली दखल घ्यायचे ठरवले.
त्यानुसार खंडोबा तालीम मंडळास त्यांचे मंडळात जाऊन सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आर्किटेक्ट जीवन बोडके यांनी प्रास्ताविक करीत ‘शहरभान’ ची भूमिका विशद केली. रंकाळ्याला केंदाळमुक्त करण्यासाठी लोकचळवळ उभी झाली.त्यावेळी ‘खंडोबा’ च्या आक्रमक भूमिकेमूळे यास गती मिळाली होती अशी आठवण श्री चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितली.
पत्रकार सुधाकर काशिद म्हणाले की, सण, उत्सव आनंदात,उत्साहात साजरा करायलाच हवा ; परंतु प्रत्येकाने साऊंड सिस्टीम आणल्यावरच आनंद मिळवता येतो हा भ्रम दूर करावा. आपल्या जुन्या परंपरा लेझीम, हलगी, ताशा, यांचा ठेका व तालही तुम्हाला नाचताना आनंद मिळवून देऊ शकतो. हे लक्षात घ्यावे.
पर्यावरण अभ्यासक सुहास वायंगणकर यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून ध्वनीप्रदूषण व त्यातून भविष्यात होणारे परिणाम यांची माहिती दिली. आणि आजचा नकार उद्यासाठी चांगले आरोग्य व आजचा होकार उद्यासाठी अनारोग्य असा विचार मांडला.
अभिनेते भरत दैनी, नितीन कुलकर्णी, वृक्षमित्र अमोल बुढ्ढे, रामेश्वर पत्की, यांनी खंडोबाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले व त्यांचे विशेष अभिनंदन केले.
खंडोबाच्या वतीने अध्यक्ष अजित हारूगले यांनी सांगितले की, आजपर्यंत आमचा असा सत्कार कोणी केला नव्हता.आम्हाला इतकं चांगलं कोणी वागवलं नव्हते. आम्ही सगळे भारावून गेलेलो आहोत.
तसेच खंडोबाचे जेष्ठ कार्यकर्ते अरूण पोवार यांनी मंडळाचे पहिले अध्यक्ष कै.देवासराव सूर्यवंशी यांचे काळापासून खंडोबाच्या कामगिरीची माहिती दिली.
यावेळी खंडोबाचे माजी फुटबॉल खेळाडू मनोज शिंदे बालिंगेकर, संतोष तावडे, गजानन, श्रीधर परब, शाम पोवार, स्वप्निल शिंदे यांचेसह अनेक जेष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. ‘शहरभान’ च्यावतीने सुधीर हांजे, अमरदीप कुंडले आदींनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शाहीर राजू राऊत, अवनिचे संजय पाटील, सत्यजित जाधव, गजानन देशमुख, किसन कल्याणकर, माजी नगरसेवक विक्रम जरग हेही यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध निवेदक पंडीत कंदले यांनी समर्पक सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली.
▪️ खंडोबा तालीम मंडळाचा आदर्श शहरातील इतर मंडळांनीही घ्यावा आणि लोकांच्या भावनेचा विचार करावा असा सूर लोकांमध्ये होता.