संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे “देशी झाडांचे वृक्षारोपण"
schedule08 Dec 25 person by visibility 63 categoryशैक्षणिक
आतिग्रे : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे “देशी झाडे लावा – विदेशी नकारा” अशी जनजागृती अतिग्रे गावामध्ये केली. देशी वनस्पती संवर्धनावर आधारित जनजागृती मोहीम अतिग्रे ग्रामपंचायत सभेदरम्यान संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवली. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत देशी वनस्पतींचे हर्बेरियम सादर केले. तसेच स्थानिक प्रजातींचे जैवविविधतेतील महत्त्व प्रभावीपणे स्पष्ट केले.
या उपक्रमासाठी परवानगी व सहकार्य दिल्याबद्दल ग्रामपंचायतचे सरपंच सुशांत वड्ड आणि ग्रामसेवक बाबासाहेब कापसे यांचे विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यामंदिर (ग्रामपंचायत शाळा), आतिग्रे येथे भेट देत आपटा, बेल, पुत्रांजीवी, गुलभेंदी आणि महोगनी यांसारख्या देशी झाडांची रोपे भेट दिली. शाळा परिसरात देशी प्रजातींचे संवर्धन करण्याचे आवाहन करून सेंद्रिय जैवविविधता जपण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
संचालिका सस्मिता मोहंती, बोर्डिंग स्कुलचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला पर्यावरणप्रेमी श्री. रोहन पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत राहिल्याबद्दल विजय देसाई आणि गोपाळ यांचेही कौतुक करण्यात आले.
ही मोहीम WWF MCOP-6 राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या प्रकल्पाचा एक भाग असून, याचे मार्गदर्शन शिक्षिका सौ. बीना इनामदार यांनी केले. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठीचे सहकार्य दृढ झाले असून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग रक्षणाची जाणीव अधिक बळकट झाली आहे.
असे मत अतिग्रेचे सरपंच यांनी व्यक्त केले. चेअरमन श्री संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.