‘श्रीगणेशा आरोग्याचा’ : कोल्हापुरात 223 शिबिरांतून 10,203 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
schedule02 Sep 25 person by visibility 273 categoryराज्य

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या अनोख्या उपक्रमाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 28 ऑगस्टपासून आतापर्यंत 223 मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 10,203 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर 1,661 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे, 2,001 नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले, आणि 872 जणांनी अवयव दानाची नोंदणी केली. हे अभियान पुढेही संपूर्ण गणेशोत्सवात राबविण्यात येणार आहे.
आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आहे.
*मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार* मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि धर्मादाय रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गणेश मंडळांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून, मंडपांजवळील शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिकांची मोफत तपासणी केली जात आहे. या शिबिरांमधून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
गणेश मंडळांचा जनजागृतीत मोलाचा वाटा गणेश मंडळांनी बॅनर आणि पत्रकांद्वारे या उपक्रमाची व्यापक जनजागृती केली. परिणामी, हजारो नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला. ही मोहीम केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सातत्यपूर्ण आरोग्य जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे
लोकाभिमुख उपक्रमाचा आदर्श मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने राबवलेला हा उपक्रम जनहिताचा उत्तम आदर्श ठरला आहे. गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक उत्सवाला आरोग्यसेवेची जोड देणारी ही अभिनव संकल्पना नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.
▪️संख्यात्मक तपशील
• 223 आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन
• 10,203 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
• 1,661 रक्तदात्यांचा सहभाग
• 2,001 आयुष्मान भारत कार्ड वितरित
• 872 अवयव दान नोंदणी
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाने कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्यसेवेचा नवा पायंडा पाडला असून, येत्या काळातही असेच उपक्रम राबवले जाणार आहेत.