शिवाजी विद्यापीठात ३० सप्टेंबरला ‘व्हॉइस ॲक्टिंग’ कार्यशाळा
schedule27 Sep 26 person by visibility 175 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभाग आणि विंडोज फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्हॉइस ॲक्टिंग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मास कम्युनिकेशन विभागात ही कार्यशाळा होणार आहे.
प्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट व लेखक भरत दैनी हे कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत. चित्रपट, दूरदर्शन, जाहिरात, डबिंग तसेच विविध दृक्-श्राव्य माध्यमांमध्ये आवाजाचा प्रभावी वापर, आवाजातील चढ-उतार, संवादफेक, व्यक्तिरेखेनुसार आवाजातील बदल, आवाजासाठी योग आणि प्राणायाम आदी बाबींवर ते मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे राहणार आहेत.
बी.ए. फिल्म मेकिंग विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव आणि विंडोज फिल्म प्रोडक्शन, कोल्हापूरचे संचालक चंद्रशेखर गुरव यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.