मुंबई येथे 133 वी डाक अदालत
schedule27 Nov 25 person by visibility 52 categoryराज्य
कोल्हापूर : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबईव्दारे 133 वी डाक अदालत 17 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वा .मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, जीपीओ बिल्डिंग, दुसरा मजला, मुंबई कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर डाकघर विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ग्राहक संतुष्टी) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, जीपीओ बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, 1 ला माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रतीसह 1 डिसेंबर पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.