ऊस वाहतूक वाहनांसाठी आरटीओ कडून सूचना
schedule27 Nov 25 person by visibility 55 categoryराज्य
कोल्हापूर : ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांनी रस्ते सुरक्षेविषयी खबरदारी घेण्याकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
ऊसाची वाहतूक ही प्रामुख्याने ट्रॅक्टर-ट्रेलर व बैलगाडी या वाहनातून प्रामुख्याने होत असते त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांनी रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या पुढच्या व मागील बाजूस दर्शनी ठिकाणी रिफ्लेक्टीव्ह टेप/बॅनर लावणे आवश्यक आहेत.ऊस वाहतूकदारांनी वाहनांची सर्व विधीग्राह्य कागदपत्रे जवळ ठेवावीत. (जसे की, वाहनाचे नोंदणी पुस्तक, विमा, अनुज्ञप्ती, इत्यादी) काही ऊस वाहतूकदार हे बैलगाडीसाठी डिझाईन केलेली (जुगाड पध्दतीची) नोंदणी नसलेल्या ट्रेलरला ट्रॅक्टर जोडून ऊस वाहतूक करीत असताना आढळून येत आहेत. तरी कोणत्याही परिस्थितीत अशाप्रकारे धोकादायक पध्दतीने ऊस वाहतूक करण्यात येऊ नये.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांतील माल हा दोरखंड, साखळी किंवा रॅचेट बेल्टने घट्ट बांधणे आवश्यक आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये. रस्त्यांच्या वळणांवर, घाट रस्त्यांवर आणि गावांमध्ये वाहने अत्यंत सावकाश चालवावीत तसेच शाळा व हॉस्पीटल, बाजारपेठ परिसरात विशेष सावधगिरी घेऊन ऊस वाहतूक करणारी वाहने चालवावीत.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी सुरक्षीत ऊस वाहतुकीसाठी खालील सूचनांचे पालन करावे
ऊस वाहतुकीस शक्यतो सुरक्षित, रुंद रस्ते निवडावेत. ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टिव्ह बॅनर/टेप लावणे सक्तीचे असून सर्व वाहनांना रिफ्लेक्टिव्ह टेप/बॅनर लावण्यात आल्याबाबत वेळोवेळी खातरजमा करावी. तसेच सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टिक बॅनर/टेप लावण्याकरीता पुरेशा प्रमाणात व वेळेत उपलब्ध होतील, याबाबत कटाक्षाने दक्षता घ्यावी. ऊस वाहतुकदारांना परावर्तक जॅकेट द्यावीत. ऊस वाहतुकीच्या वाहनांना अनावश्यक हॉर्न व कर्णकर्कश आवाजाच्या ध्वनी यंत्रणेचा वापर करण्यास पूर्णपणे मज्जाव करावा. ऊस वाहतूक करणारे वाहन उलटणे, आग लागणे इत्यादीकरीता Emergency Team व ॲम्बुलन्स नेहमी उपलब्ध ठेवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.