तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; कोल्हापूर पोलिसांच्या कामगिरीवर ५० हजारांचे बक्षीस
schedule11 Jun 26 person by visibility 148 categoryगुन्हे
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेल्या तिलारी घाटात काही दिवसांपूर्वी एका ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. ही हत्या नैसर्गिक नसून हत्याराच्या सहाय्याने करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते. या अत्यंत आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गेल्या २९ मे रोजी तिलारी घाटातील जंगलात हा मृतदेह सापडल्यानंतर चंदगड पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचा सखोल अभ्यास आणि शेजारील जिल्हे व राज्यांमधील मिसिंग प्रकरणांची माहिती एकत्रित केली. तपास करत असताना बेळगाव ते हुबळी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित बसवराज येलाप्पा करणावर याला निष्पन्न केले.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिनोळी (ता. चंदगड) परिसरात सापळा रचून यल्लाप्पा महिलाप्पा करणावर, बसवराज यल्लाप्पा करणावर आणि लगमाप्पा लगमाप्पा अंकलगी या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गंगव्वा सत्त्याप्पा हंचीमणी (वय २५, रा. वंटमोरी, बेळगाव) हिचा खून केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या क्रुझर गाडीच्या चालकाचा अपघात झाल्याने तो सध्या उपचाराधीन आहे. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तपास पथकासाठी ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गठित केलेल्या पथकामध्ये खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता:
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उप विभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखडे, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उप निरीक्षक विजय कोळेकर, शेष मोरे, अतिष म्हेत्रे तसेच पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, विजय इंगळे, समीर कांबळे, संजय कुंभार, तुकाराम राजीगरे, अमित सर्जे, युवराज पाटील, अनिल जाधव, अरुण धनगर, सागर चौगले, आनंदा नाईक, राम पाटील आणि सुशिल पाटील यांनी ही कामगिरी केली आहे.