SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कॅप्टन शुभांशू स्वागतम्, आम्हाला आपला अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडीकेटीईच्या २९ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत निवडकोल्हापूर : कावळा नाका पार्किंगमध्ये ट्रॅव्हल्स स्थलांतराची तयारी; प्रशासक के.मंजूलक्ष्मी व पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांची संयुक्त पाहणीकोल्हापुरात अनधिकृत अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई : 5 हातगाड्या, 15 स्टॅण्ड बोर्ड, स्वागत कमान जप्तपन्हाळा तहसिल कार्यालयात 21 जुलैला लोकशाही दिनाचे आयोजनमुंबईत कोल्हापुरातील कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश, माजी नगरसेवक दिलीप पवार, उत्तम कोराणे, अभिषेक बोंद्रे यांच्यासह प्रसाद जाधव, संताजी घोरपडे यांचा समावेश डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करारकुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार : प्रकाश आबिटकरमहाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वाससेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा : नविद मुश्रीफ; गोकुळ तर्फे ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

जाहिरात

 

मनाशी बोलणारा लेखनप्रवास – 'सांगायचा मुद्दा असा'!

schedule15 Jul 25 person by visibility 165 categoryसामाजिक

कोल्हापूर  : गेले 34 वर्षे उभ्या-आडव्या महाराष्ट्रात चांध्यापासून बांद्यापर्यंत, शाळा-महाविद्यालयापासून ते स्पर्धा परीक्षा केंद्रापर्यंत शासकीय कार्यालयांपासून कार्पोरेट पर्यंत अनेक व्याख्यानातून आणि वर्कशॉपमधून परिचित असणारे माईंड ट्रेनर विठ्ठल कोतेकर यांचे छोटेखानी नव्याने आलेले ‘ सांगायचा मुद्दा असा ’ हे पुस्तक आत्मचरित्र वजा प्रेरणादायी मार्गदर्शक असेच आहे.

लेखकाने स्वतःच मुखपृष्ठावर या पुस्तकाची कॅचलाईन  *"हे पुस्तक वाचण्यासाठी नव्हे, तर स्वतःला नव्याने घडवण्यासाठी आहे"* — दिलेली आहे. याची प्रचिती या पुस्तकातील 21 प्रकरणे वाचताना वेळोवेळी येत जाते.

पुस्तकाची अर्पण पत्रिका वाचकाला एक भावनिक वलय निर्माण करणारी ठरते. आपल्या जन्मगावी, मनगुती येथे घराचं स्वप्न साकार होण्यासाठी वडिलांनी केलेली पुतळ्या हा सोन्याचा दागिना विकण्यास तयार होणं आणि विकण्यास दिलदारपणे देणारी आई, ही एक पहिल्यांदाच मला प्रभाव टाकणारी, मॅनेजमेंट व भावनिकतेचा समन्वय साधणारी गुरू आहे, हे नमूद करत त्यांनी हे पुस्तक तिला अर्पण केले आहे.

अवघ्या 96 पानांच्या या पुस्तकातली 21 प्रकरणं ही खरं म्हणजे व. पु. काळे यांच्या वपुर्झा या पुस्तकाप्रमाणेच आहेत. अवघ्या तीन-चार पानांच्या एकेका प्रकरणातून वेगवेगळे दृष्टिकोन आपल्या वाचकाला, खास करून युवा वर्गाला, नवी दिशा देणारे ठरतात आणि हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे.

शिकण्याची प्रचंड जिद्द असताना शालेय जीवनात प्रतिकूल परिस्थितीत गाईड विकत घेण्यासाठी मिरच्या विकण्याचा प्रसंग त्यांनी एका प्रकरणात नमूद केलेला आहे. तर कोल्हापुरात शिकत असताना टायपिंग आणि त्यामधील कौशल्य शिकणे, उच्च गुणवत्तेचे काम करणे, आणि त्यामधून दर्जेदार पद्धतीत टिकवत आउटसोर्सिंग निर्माण करून 30 ते 40 जणांना काम देणे, ते वक्तशीरपणे पोहोचवणे यामधूनच त्यांच्या उपजत असणाऱ्या आणि यशस्वी माईंड ट्रेनर म्हणून बनलेल्या व्यक्तिमत्त्वाची बीजे दिसून येतात.

"आपलं आयुष्य हे अनेकांनी घडवलं, त्यामुळेच 'हे माझ्यामुळे झालं ते माझ्यामुळे झालं' असं पालुपद न लावता, आपल्या जीवनातील यशस्वितेचे श्रेय विविध व्यक्तींना व त्यांच्या शिकवणीस सहजपणे देतात."

‘लीड घेतलं म्हणून लीड मिळालं’ या प्रकरणातून त्यांनी आपण जबाबदारी स्वीकारली आणि त्याला अप्रोच ठेवला तर ध्येय नक्कीच साध्य होतं" — हा मौलिक विचार मांडला आहे.

समुपदेशन हे दहावी-बारावीच्या परीक्षार्थींसाठी आता एक क्रेझ म्हणून सांगितले जाते. मात्र, असे कोणतेही क्लासेस किंवा हवा नसताना, “गणिताची काही काळजी करू नकोस, मी आहे,” असा त्यांनी दिलेला मंत्र आणि त्याचा झालेला प्रभाव हे वाचण्यासारखे आहे.

खास कोल्हापुरी ‘मागून खातंय राव’ या प्रकरणातून त्यांनी यशस्वी झालेल्या माणसाकडे पार्टी मागणाऱ्या आणि विविध नाममात्र कारणांस्तव जेवण मागणाऱ्यांवर चिमटा घेत प्रबोधन केले आहे. यशस्वी माणसाचं जेवण जेवण्यापेक्षा आपणच मोठं यशस्वी व्हावं, असं त्यांनी त्यामधून नेमकेपणाने नमूद केलं आहे.

आज सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या आणि भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर, ‘इंग्लिशमध्ये होतंय का बघा’ या प्रकरणातून त्यांनी आपल्या माय मराठी विषयावरील ठामपणा दाखवून दिला आहे. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी तब्बल दीड वर्ष व्याख्यान न देता, इंग्रजीमध्ये न बोलता ते मराठीतच देण्यासाठी त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि त्यानंतर मराठीतूनच संवाद साधत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिलेला प्रेरक अनुभव सर्वांसाठी अंतर्मुख करणारा आणि आजच्या राज्यकर्त्यांसाठी चपराक देणारा ठरतो.

‘मुलावर आपली इच्छा लादताय होय’ या प्रकरणात करिअरचा बागुलबुवा न करता, त्यामधून नेमकं सांगितलं आहे की आपण आपल्या पाल्यांना कसं घडवावं.  राजे महाराजे कसे घडले गेले याचं सार त्यांनी योग्य रित्या मांडले आहे.

आज उद्योजकांमध्ये दुसरी-तिसरी पिढी तितक्या समर्थपणे का कार्य करत नाही, आणि त्यावर नेमकं काय केलं पाहिजे याचा मौलिक सल्ला त्यांनी यामध्ये दिला आहे.

गेल्या तीस वर्षांत आपली दर्जेदार पुस्तक प्रकाशन, तसेच समुपदेशन प्रवास या सर्वांसाठी सहकारी म्हणून कार्य करत असलेला आपला सहकारी कामगार दत्ता उर्फ दत्तात्रय गडकरी यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल आणि मिळालेली मोलाची साथ हेही त्यांनी नमूद करत माणसं कशी घडवावी लागतात याचं मॅनेजमेंट केलं आहे. व्यवहारा पलीकडे, भावनेतून त्यांनी हे दाखवून दिलं आहे.

त्याचबरोबर आर्थिक बाबतीत, टायपिंग मशीन घेण्यापासून ते करोडोंतील व्यवहारापर्यंत वेळोवेळी झालेली मदत, बँकिंग अधिकाऱ्यांनी दिलेले मौलिक सल्ले  यांचेही त्यांनी स्मरण केले आहे.

हे पुस्तक एका दमात नक्कीच वाचून होते. मात्र, ते तसे वाचतानाच, सकाळी आपण विविध प्रकारचे मनाच्या मूडप्रमाणे सेंट लावतो त्याप्रमाणेच, त्यातील एखादे प्रकरण जरी रोज वाचले आणि ते दिवसभर मनात ठेवले, तरी त्यामधून आपली दृष्टी व्यापक आणि प्रचंड सकारात्मक होऊन जाते.

हेच या आत्मचरित्रवजा पुस्तकाचं *‘सांगायचा मुद्दा असा’* या अक्षरधनाचं मोठं यश ठरतं.

आज विविध समूहांमध्ये, अनेक गावांमध्ये, विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे अनेक जण फोनवर “हॅलो, लई भारी!” असं म्हणतात, तसेच सकाळी भेटल्यावर “सुप्रभात” म्हणण्याऐवजी “लई भारी!” म्हणून एक  साथ घालतात. या *“लई भारी” टेक्निकचे जनक* विठ्ठल कोतेकर यांचे हे आत्मचरित्रवजा नवी दृष्टी देणारे पुस्तक नक्कीच प्रत्येकाला जीवन संघर्षात सकारात्मकता वाढवणारे ठरते.

सदर लेखकाकडे असे अनेक किस्से नक्कीच आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे पुढील किमान दहा भाग यावेत, असं वाचकांना वाटणं हेच या पुस्तकाचं मोठं यश ठरतं.

अशा विविध पैलूंनी अनुभव घेण्यासाठी 'सांगायचा मुद्दा असा' हे पुस्तक जाणकारांनी आणि युवकांनी नक्कीच वाचलं पाहिजे.


▪️पुस्तक परिचय वजा समीक्षण - 'सांगायचा मुद्दा असा'
लेखक - विठ्ठल कोतेकर
प्रकाशन - विवेक पब्लिकेशन, जदुबन प्लाझा, पाच बंगला , कोल्हापूर
पृष्ठ संख्या - 96
प्रकरणे - 21
*किंमत - ₹130

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes