कॅप्टन शुभांशू स्वागतम्, आम्हाला आपला अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule15 Jul 25 person by visibility 222 categoryराज्य

मुंबई : “स्वागतम् कॅप्टन शुभांशू , आपण तमाम भारतीयांचे अभिमान ठरला आहात. या यशस्वी मोहिमेसाठी आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन..! अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे आज पृथ्वीवरील आगमनासाठी स्वागत तसेच या या यशस्वी मोहिमेसाठी अभिनंदन केले आहे.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि त्यांचे सहकारी ‘ॲक्सिओम-४’ ही अंतराळ मोहीम यशस्वी करून पृथ्वीवर परतले. या यशस्वी मोहिमेमुळे भारतीयांचा अवकाश संशोधन क्षेत्रातील आत्मविश्वास दुणावला आहे.
भारतीय तरुणांसाठी ही मोहीम प्रेरणादायी ठरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीक्षेपातील अवकाश संशोधन क्षेत्राच्या विकासासाठी टाकले गेलेले हे महत्त्वाचे पाऊल तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. त्यासाठी कॅप्टन शुभांशू यांचे आणि त्यांच्या या साहसाला पाठबळ देणाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचेही मनापासून अभिनंदन,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.