कोल्हापुरात अनधिकृत अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई : 5 हातगाड्या, 15 स्टॅण्ड बोर्ड, स्वागत कमान जप्त
schedule15 Jul 25 person by visibility 313 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून टाऊन हॉल, सी.पी.आर. चौक, पार्वती टॉकीज चौक व सायबर चौक परिसरातील सिग्नल जवळील अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 5 हातगाड्या, 15 लोखंडी स्टॅण्ड बोर्ड, 8 लोखंडी जाळ्या व 1 स्वागत कमान जप्त करण्यात आली. तर 33 हातगाड्या मालकांनी स्वयंहून हटवल्या.
शनिवार, दिनांक 12 जुलै 2025 रोजी पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक कोंडी व अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. यामध्ये सिग्नलजवळील अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने आज ही संयुक्त कारवाई केली.
सदर कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुण गुजर, अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहा. अधीक्षक प्रफुल्ल कांबळे व त्यांच्या पथकाने केली. कारवाईत लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहभागी होते.
तरी अनधिकृत फेरीवाले, दुकानाबाहेर उभारलेले अनधिकृत शेड तसेच रस्त्यावर पार्किंग जागांवर लावलेले स्टॅण्ड बोर्ड तत्काळ हटवावेत. अन्यथा अशा अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात येईल व साहित्य जप्त करण्यात येईल असे आवाहन महापालिकेने केले आहे.