31 मार्चपूर्वी 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा : प्रशासक के. मंजूलक्ष्मी
schedule27 Jan 26 person by visibility 147 categoryमहानगरपालिका
▪️नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आज प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. ही बैठक सकाळी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी 31 मार्चपूर्वी सर्व संबंधित विभागांनी 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना प्रशासकांनी दिल्या. मोठ्या थकबाकीदार मिळकतींवर संबंधित विभागांनी तातडीने नोटिसा बजावून बोजा नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
नगररचना विभागाने आजअखेर 51 कोटी रुपयांची वसुली केली असून उर्वरित कालावधीत ती 100 कोटींच्या पुढे नेण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुढील 15 दिवसांत दोन विशेष कॅम्पचे आयोजन करण्याचे निर्देश यावेळी सहाय्यक संचालक नगररचना यांना देण्यात आले. घरफाळा विभागाच्या सर्व्हेमधील नवीन व अतिरिक्त बांधकामाची माहिती घेऊन नगररचना विभागाने तपासणी करुन वसुली करावी. प्रत्येक कनिष्ठ अभियंत्यास लक्ष्य निश्चित करून आठवड्याला आढावा घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आल्या.
घरफाळा विभागाने आजअखेर 52 कोटी 41 लाख रुपयांची वसुली केली आहे. मोठ्या थकबाकीदारांशी थेट संपर्क साधून वसुली करावी, तसेच नोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. शासकीय थकबाकी असलेल्या विभागांशी समन्वय ठेवून 31 मार्चपूर्वी रक्कम वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले.
पाणीपुरवठा विभागाने 35 कोटी रुपयांची वसुली केली असून मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचना जल अभियंत्यांना देण्यात आल्या. ग्रामपंचायतींच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले.
इस्टेट विभागाने केवळ 7 कोटी 35 लाख रुपयांची वसुली केल्याबद्दल प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली. थकबाकीदारांना नोटिसा बजावून गाळे सील करण्याचे तसेच होर्डिंग थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. परवाना विभागाने 2 कोटी 32 लाख रुपयांची वसुली केली असून शहरातील सर्व दुकानांचा सर्व्हे करून परवाने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, रचना व कार्यपद्धती अधीक्षक प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपस्थित होते.