वादळी वाऱ्यामुळे मुख्य वीज वाहिनी बाधित; काळम्मावाडी योजनेचा पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत
schedule02 Apr 26 person by visibility 90 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : काळम्मावाडी पाणीपुरवठा योजनेच्या सबस्टेशनला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीजवाहिनीवर वादळी वाऱ्यामुळे झाडाची फांदी पडल्याने संबंधित सबस्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे काळम्मावाडी योजनेतून होणारा पाणी उपसा तात्पुरता थांबला आहे.
सदर बिघाड दुरुस्तीसाठी महानगरपालिकेच्या वीज व पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीने काम हाती घेण्यात आले असून, हे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे दीड दिवसाचा कालावधी लागणार आहे.
दरम्यान, नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी उपाययोजना म्हणून शिंगणापूर योजनेतून तसेच बालिंगा व नागदेववाडी येथून तातडीने पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. यामुळे शहरात दैनंदिन पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येत असला तरी काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
तरी नागरिकांनी या कालावधीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.