परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
schedule24 Apr 26 person by visibility 129 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत असून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्र राज्यातील पात्र विद्यार्थ्यांकडून विविध शाखा व अभ्यासक्रमांसाठी एकूण ७५ जागांसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
या शिष्यवृत्ती संदर्भातील शासन निर्णय, अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच पात्रतेच्या अटी-शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी
https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in
आणि https://dirobbwd.maharashtra.gov.in
या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्यासाठी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून सर्व कागदपत्रे ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने सादर करावीत. तसेच अर्जाची छापील प्रत आवश्यक स्वहस्ताक्षरीत (Self Attested) कागदपत्रांसह दिनांक २१ मे रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे (आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम.एच.बी. कॉलनी, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे – ४११००६) येथे जमा करणे बंधनकारक आहे.
निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही,अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.