मानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमाने
schedule03 Feb 26 person by visibility 94 categoryशैक्षणिक
▪️हिंदी अधिविभागात ‘आयसीटी’वर राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर : आजच्या युगात तंत्रज्ञानाचा उपयोग अनिवार्य असला तरी त्याचा मर्यादित वापर केला पाहिजे. गरजेपेक्षा अधिक तंत्रज्ञानाचा उपयोग माणसाला भावनाशून्य बनवितो. मानवी जीवनामध्ये भावना आणि संवेदनांना खूप महत्त्व आहे. सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असे मत मुंबई येथील ‘फोर्स वन’चे पोलीस अधीक्षक तथा प्रशिक्षक गजानन राजमाने यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागात ‘पीएम उषा’ सॉफ्ट कॉम्पॉनंट योजनेअंतर्गत मंगळवारी ‘भाषा प्रयोग एवं अध्यापन में आयसीटी’ विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते.
यावेळी विविध सत्रांमध्ये विषयतज्ज्ञांनी विस्तृत मार्गदर्शन केले. शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या डॉ. रूपाली संकपाळ यांनी शिक्षणामध्ये शिक्षकांच्या कौशल्यवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक अभ्यास आणि लेखकीय अधिकार’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतात एआय व तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता, त्याचा उपयोग सहायक म्हणून केला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय चर्चामध्ये संशोधकांनी शोधनिबंधांचे वाचन केले. आसाम येथील प्रागज्योतिष महाविद्यालयाच्या डॉ. नंदिता राजबंशी अध्यक्षस्थानी होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे प्रमुख डॉ. साताप्पा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा समारोप झाला. विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव अध्यक्षस्थानी होते. डॉ. सुषमा चौगले, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. अक्षय भोसले व डॉ. जयसिंग कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिली. डॉ. गीता दोडमणी यांनी सूत्रसंचालन केले. प्रतीक्षा ठुंबरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. संतोष कोळेकर, डॉ. अनिल मकर, डॉ. प्रकाश निकम यांच्यासह शिक्षक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.