अभियंत्यांनी नोकरी शोधणारे नाही, तर नोकऱ्या देणारे व्हावे " राज्यपाल जिष्णु देव वर्मा
schedule16 Aug 26 person by visibility 96 categoryशैक्षणिक
पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाची भारताच्या आर्थिक व राष्ट्रीय विकासात योगदान देणाऱ्या तंत्र उद्योजकांच्या नवीन पिढीला दिशा देणारी संस्था बनण्याची क्षमता आहे. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी सीओईपीच्या दीक्षांत समारंभात केले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, सीओईपीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर्स, हरित ऊर्जा व हवामान बदल यांसारख्या क्षेत्रांत समस्या सोडवण्याचे जागतिक केंद्र बनावे. माजी विद्यार्थ्यांच्या बळावर आणि उद्योगांच्या सहकार्याने विद्यापीठाने नवनवीन संशोधन व स्टार्टअप्सला प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
या दीक्षांत समारंभात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीओईपीच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. कॅम्पसमध्ये मुलींसाठी ४०० विद्यार्थीनी क्षमतेचे नवीन वसतिगृह शासकीय निधी व सीएसआरच्या माध्यमातून तातडीने बांधण्यात येणार असून ग्रामीण भागातील १० होतकरू विद्यार्थिनींना प्रत्येकी १ लाख रुपये शैक्षणिक मदत दिली जाईल. तसेच 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत ५० विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा त्यांनी केली.
शासनाच्या शुल्कमाफीच्या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील मुलींची संख्या सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, कुलगुरू प्रा. सुनील भिरुड यांनी प्रास्ताविकात, आजच्या दीक्षांत समारंभात ८८९ पदवी आणि ५८२ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येत असल्याची माहिती दिली.
तसेच लवकरच सुरू होणाऱ्या चिखली येथील संशोधन संकुलामुळे उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील सहकार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.