आर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
schedule02 Jul 25 person by visibility 187 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त आणि आर्थिक पारदर्शकता महत्त्वाची असते. आर्थिक साक्षरतेच्या मोहिमेत अर्थतज्ज्ञ, लेखकांची भूमिका महत्त्वाची आहे. विशेषतः अलीकडच्या काळात वाढत असलेली आर्थिक फसवणूक विचारात घेता नागरिकांचे आर्थिक प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी व्यक्त केले.
मराठी विश्व कोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य प्रा.संजय ठिगळे यांनी कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य व प्रख्यात लेखक-समीक्षक डॉ.रणधीर शिंदे यांना ‘अर्थतरंग’ हे पुस्तक भेट दिले. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील म्हणाले, अर्थसाक्षरतेशिवाय विकास शक्य नाही. विशेषतः तरुणाईने त्यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे.
डॉ.रणधीर शिंदे म्हणाले, प्रा. ठिगळे यांच्या अर्थतरंग पुस्तकाच्या माध्यमातून अर्थसाक्षरतेला निश्चितपणे चालना मिळेल.
यावेळी प्रा. ठिगळे म्हणाले, शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा समन्वयक म्हणून काम करीत असताना समाजाशी नाळ जोडली गेली. त्या अनुभवाचा फायदा लेखन करण्यासाठी झाला. कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी प्रा. ठिगळे यांच्या समाज जागृतीपर लेखन उपक्रमाचे कौतुक केले.