महिलांना संधी, हक्क आणि सुरक्षिततेची जाणीव करून देण्यावर भर: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव
schedule27 Aug 26 person by visibility 131 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महिलांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, रोजगार आणि समाजातील विविध क्षेत्रांत पुढे यावे, यासाठी त्यांना उपलब्ध संधी, सुविधा आणि हक्कांची माहिती असणे आवश्यक आहे. महिलांचा आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढविण्यासोबतच समाजातील प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी संवाद आणि मार्गदर्शनाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले. महिलांना सक्षमीकरणाच्या दिशेने प्रेरित करणाऱ्या ‘She Talk’सारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना त्या बोलत होत्या.
शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थिनी वसतिगृह आणि स्वयंसिद्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘She Talk’ उपक्रमात बोलताना डॉ. जाधव म्हणाल्या, महिलांना उपलब्ध असलेल्या विविध संधी, सुविधा, हक्क आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि निर्णयक्षमता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे महिलांनी उपलब्ध संधींचा केवळ लाभ न घेता स्वतःच्या क्षमता ओळखून आत्मनिर्भर होण्याची दिशा स्वीकारावी, असे आवाहनही डॉ. जाधव यांनी केले.
डॉ. प्रतिभा देसाई यांनी ‘स्वयंसिद्धा’ या महिलांसाठीच्या ॲपची माहिती देताना महिलांनी केलेले उपक्रम, मिळविलेले यश तसेच महिलांनी सामूहिकपणे राबविलेले उल्लेखनीय उपक्रम या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचविता येत असल्याचे सांगितले. तसेच ‘स्त्रीशक्ती पोर्टल’वर नोंदणी करण्याची प्रक्रिया आणि त्याचा उपयोग याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनी वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी असलेल्या ‘POSH’ कायद्याबाबत मार्गदर्शन केले. सुरक्षित कार्यस्थळ, महिलांचे कायदेशीर अधिकार, लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी उपलब्ध यंत्रणा तसेच तक्रार निवारणाची प्रक्रिया याबाबत त्यांनी माहिती दिली.
साक्षी धनावडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. कविता वड्राळे, डॉ. मीना पोतदार, विद्यार्थिनी वसतिगृहातील कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉ. ज्योती खराडे यांनी आभार मानले.