कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्याकडून चरस तस्करी; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
schedule13 Jul 26 person by visibility 153 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ७१ ग्रॅम चरससह अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थासह १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी दिलेल्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, उचगाव ते गडमुडशिंगी रोडवर एक इसम चरस विक्रीसाठी येणार असल्याचे समजले.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून ओंकार अर्जुन मिठारी (वय २७, रा. गणेश कॉलनी, उचगाव) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ७१ ग्रॅम वजनाचे ७१ हजार रुपये किमतीचे चरस सापडले. पोलिसांनी त्याच्याकडील मोटारसायकल (एम.एच.०९ एफ.ए. २६५२) आणि मोबाईलसह एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विमानतळावरील बाथरूममधून चोरला होता अंमली पदार्थ
चौकशीदरम्यान आरोपी ओंकार मिठारी याने धक्कादायक खुलासा केला आहे. तो कोल्हापूर विमानतळावर बेल्ट ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. ११ जुलै रोजी मयुर माने आणि त्याच्या साथीदारांनी ओंकारला गाठून, "आमच्या एका मित्राने विमानातून प्रवास करताना पोलीस चेकिंगच्या भीतीने हा अंमली पदार्थ विमानतळावरील बाथरूममध्ये टाकला आहे, तो बाहेर काढून द्या," असे आमिष दाखवले. ओंकारने बाथरूममधून ते पार्सल बाहेर काढले, परंतु मयुर मानेने नंतर संपर्क न केल्यामुळे, ओंकारने स्वतःच्या फायद्यासाठी ते चरस विकण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मयुर गणेश माने (वय ४०, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) यालाही ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.