राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्प उभारणीचा ऐतिहासिक टप्पा : सरन्यायाधीश भूषण गवई; महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्पाचा प्रारंभ
schedule05 Nov 25 person by visibility 39 categoryराज्य
मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्प उभारणी हा ऐतिहासिक टप्पा आहे. राज्य शासनाने कायदा शिक्षणासाठी दाखविलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात न्यायपालिकेच्या पायाभूत सुविधांचा दर्जा देशात सर्वोत्तमांपैकी एक आहे, असे गौरवोद्गार सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे प्र-कुलगुरू न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती संदीप मर्ने, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिलीप उके, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने मौल्यवान जागा उपलब्ध करून दिल्याचे नमूद करून हा प्रकल्प केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ठरेल, असा विश्वास सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केला. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, कायद्याचे शिक्षण हे केवळ व्यवसाय नव्हे, तर समाज परिवर्तनाचे साधन आहे. वकील हे समाज अभियंते आहेत, जे सामाजिक आणि आर्थिक न्याय साकारतात.
महाराष्ट्र हे तीन राष्ट्रीय विधि विद्यापीठ असलेले देशातील एकमेव राज्य आहे. मुंबई विद्यापीठाच्या अत्याधुनिक प्रकल्प उभारणीसाठीच्या सर्व परवानग्या पूर्ण झाल्या आहेत. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधि शिक्षणाचे केंद्र बनेल. नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या ‘एज्यु-सिटी’मध्ये जगातील सर्वोच्च विद्यापीठे येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आजच्या काळात उद्योग, व्यवसाय, सामाजिक जीवन आणि राजकारण या सर्व क्षेत्रांचा संबंध शिक्षण क्षेत्राशी घट्ट जोडलेला आहे. आज मानवी संपत्ती ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. पूर्वी मनुष्यबळ भांडवलाकडे जात असे, आता भांडवल मनुष्यबळाकडे येते. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वोत्तम मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर म्हणाले, विधि विद्यापीठ हे केवळ शिक्षण देणारे केंद्र नसून, उत्तम नागरिक घडवण्याचे स्थान आहे. शिक्षणाचा उद्देश फक्त ज्ञान मिळवणे नसून जीवनात उत्कृष्टता आणि मानवी मूल्यांचा विकास साधणे हा आहे. चांगला विद्यार्थी, शिक्षक किंवा नागरिक तोच होऊ शकतो जो प्रथम चांगला माणूस आहे, असे त्यांनी नमूद केले.
कुलगुरू दिलीप उके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर कुलसचिव प्रकाश चौधरी यांनी आभार मानले.