SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
MAS अभियानात कोल्हापूर जिल्ह्याची ‘सुरक्षित’ श्रेणीत झेप; राष्ट्रीय स्तरावर होणार सन्मानदत्तवाडच्या आरोग्य शिबिरात ३२० नागरिकांची तपासणीऊस शेतीत AI तंत्रज्ञानाची कमाल ; एकरी १०२ मे. टन उत्पादनाचा विक्रम'हिम्मत असेल तर आबिटकरांच्या घरावर मोर्चा घेऊन जावा'; के. पी. पाटलांना सतेज पाटलांचे खुले आव्हानशक्तिपीठ मोजणी, बेळगावचे कन्नड बोलणे अन् डीलिमिटेशनचा डाव; सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल!तपोवन मैदानावर ४ ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजनजैवविविधतेचा रक्षक: जागतिक जॅग्वार दिनसंजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातडिलिमिटेशनवरून महाविकास आघाडीत ठिणगी! पवारांच्या भूमिकेचे मुश्रीफांकडून स्वागत; वडेट्टीवार-राऊतांचा समाचार‘गोकुळ’च्या प्रगतीत प्राथमिक दूध संस्था कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा : चेअरमन राजेश पाटील

जाहिरात

 

MAS अभियानात कोल्हापूर जिल्ह्याची ‘सुरक्षित’ श्रेणीत झेप; राष्ट्रीय स्तरावर होणार सन्मान

schedule29 Nov 26 person by visibility 113 categoryराज्य

◼️१ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांचा गौरव

कोल्हापूर : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (NACO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात आलेल्या मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा (MAS) अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने ‘संघर्षशील’ श्रेणीतून ‘सुरक्षित’ श्रेणीत प्रवेश मिळवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांपासून हे अभियान राबविण्यात आले. NACO च्या ९५-९५-९५ या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने विशेष प्रयत्न केले. यामध्ये एचआयव्ही संसर्गित व्यक्तींपैकी किमान ९५ टक्के व्यक्तींचे निदान करणे, निदान झालेल्यांपैकी ९५ टक्के व्यक्तींना अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (ART) उपचारांशी जोडणे आणि उपचार घेत असलेल्या किमान ९५ टक्के व्यक्तींचा विषाणूभार नियंत्रणात आणणे, या तीन महत्त्वपूर्ण उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्ह्याने ‘संघर्षशील’ श्रेणीतून ‘सुरक्षित’ श्रेणीत यशस्वी मजल मारली आहे. यापुढे ‘सुरक्षित प्लस’ श्रेणी प्राप्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांनी ‘सुरक्षित’ श्रेणी प्राप्त केल्यामुळे महाराष्ट्र राज्यालाही या श्रेणीत स्थान मिळाले आहे.

जिल्हास्तरावर या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमिन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.           जिल्ह्यातील एड्स प्रतिबंधासाठी कार्यरत संस्था, एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रे (ICTC), ART उपचार केंद्रे तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी या उद्दिष्टपूर्तीसाठी मोलाचे योगदान दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes