इचलकरंजीत युवकाचा निघृण खून; दोघांना अटक
schedule31 Mar 24 person by visibility 298 categoryगुन्हे
कोल्हापूर : गाडीचे हप्ते भरण्यावरुन झालेल्या वादातून रोहित बाळू तडाखे (वय २५ रा. साईट नं.१०२) याचा तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करुन गळा चिरुन खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. साईट नं. १०२ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे ही घटना घडली. या प्रकरणी मृताची आई श्रीमती राधा तडाखे यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राहुल विनोद पाथरवट, संदेश विनोद पाथरवट या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली असून नाथा उर्फ शंकर हा फरारी आहे.
मुळचा जाधव मळा परिसरात राहणारा रोहित तडाखे हा काही महिन्यांपासून साईट नं. १०२ मधील रमाई आवास घरकुल योजनेतील घरात घुसखोरी करुन रहात होता. याच परिसरातील राहुल पाथरवट याच्याशी रोहित याचा सहा महिन्यांपूर्वी वाद झाला होता. राहुल पाथरवट याने रोहित तडाखे याच्या नावे कर्जप्रकरण करुन दुचाकी घेतली होती. परंतू त्या दुचाकीचे हप्ते राहुल याने न भरल्याने त्याच्या वसुलीसाठी बँकेचे लोक रोहित याच्या घरी येत होते. सततच्या या तगाद्याला रोहित त्रासला होता. यासंदर्भात रोहित याने राहुल याच्याकडे तू गाडीचे हप्ते का भरत नाहीस अशी विचारणा केली. त्यावरुन रोहित व राहुल यांच्यात भांडण झाले होते. त्यातूनच राहुल व संदेश पाथरवट आणि शंकर या तिघांनी रोहित याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
पूर्वीच्या भांडणाच्या वादातून शुक्रवारी रात्री पुन्हा रोहित व राहुल यांच्यात वाद झाला. त्या वादातच राहुल, संदेश व शंकर या तिघांनी धारदार चाकूने रोहित याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये रोहित याचा जागीच मृत्यू झाला.
रोहित याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गावभाग पोलिसांनी राहुल पाथरवट, संदेश पाथरवट व शंकर जावीर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
यातील संशयित राहुल पाथरवट हा पोलिस रेकार्डवरील गुन्हेगार आहे. या खून प्रकरणी गावभाग पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत राहुल आणि संदेश या दोघांना अटक केली आहे. तर तिसरा संशयित फरारी शंकर जावीर आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक प्रविण खानापूरे करत आहेत.