गणेशोत्सवात कायदा मोडाल तर याद राखा! करवीर उपविभागात १७२ सराईत गुन्हेगारांची ओळखपरेड; पोलिसांचा कडक इशारा
schedule05 Sep 26 person by visibility 192 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आगामी गणेशोत्सव २०२६ हा सन अत्यंत शांततामय, उत्साहपूर्ण वातावरणात तसेच कायदा व सुव्यवस्था चोख राखून पार पाडावा, यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या कठोर आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांना तीव्र वेग देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाण्यात करवीर उपविभागातील मागील ५ वर्षांत गणेशोत्सव काळात गुन्हे दाखल असलेल्या तब्बल १७२ सराईत गुन्हेगारांची धडक ओळखपरेड घेण्यात आली.
यापूर्वी सन २०२० ते २०२५ या कालावधीमध्ये गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावणारे आणि विविध गुन्ह्यांत गुंतलेल्या गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्यात आला होता. या सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवत करवीर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
ओळखपरेडमध्ये हजर असलेल्या सराईत गुन्हेगारांची पोलीस ठाणेनिहाय आकडेवारी:
* करवीर पोलीस ठाणे: ६० आरोपी
* शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे: ५१ आरोपी
* मुरगूड पोलीस ठाणे: १८ आरोपी
* कागल पोलीस ठाणे: १३ आरोपी
* गांधीनगर पोलीस ठाणे: १२ आरोपी
* इस्पुर्ली पोलीस ठाणे: ०६ आरोपी
* एकूण सराईत आरोपी: १७२
सदर धडक ओळखपरेडवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग आप्पासो पवार यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक आरोपीची कसून ओळख पडताळणी केली. आगामी गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारची मस्ती चालणार नाही, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणाल किंवा दोन समाजात तेढ निर्माण कराल अशी कोणतीही खुमखुमी दाखवू नका, अशा स्पष्ट शब्दांत सक्त ताकीद देण्यात आली.
सोशल मीडियावर अफवा पसरवणे, आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त पोस्ट टाकून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. गणेशोत्सवात दहशत माजवणाऱ्या किंवा कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही मुजोर व्यक्तीवर कसलीही दयामाया न दाखवता अत्यंत कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करून थेट कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड दम यावेळी भरण्यात आला.
सण उत्साहात आणि पूर्ण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून संवेदनशील ठिकाणांवर विशेष पहारा असणार आहे. नागरिकांनीही कोणत्याही अफवांना न जुमानता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या धडक कारवाईवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्यासह करवीर, गांधीनगर, कागल, शिरोली MIDC, गोकुळ शिरगाव, ईस्पूर्ती आणि मुरगूड पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व गोपनीय अंमलदार उपस्थित होते.