भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत इतिहास रचला: दक्षिण आफ्रिका ५२ धावांनी पराभूत
schedule03 Nov 25 person by visibility 140 categoryक्रीडा
मुंबई : ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, भारताच्या महिलांनी अखेर इतिहास रचला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. भारतीय महिला संघाने पहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद पटकावला. ८७ धावा आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट घेणाऱ्या २१ वर्षीय शफाली वर्मा हिला प्लेअर ऑफ द फायनल म्हणून गौरविण्यात आले.
डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने ७ बाद २९८ धावा केल्या. शेफालीने ८७, दीप्ती शर्माने ५८, स्मृती मानधना ४५ आणि रिचा घोषने ३४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने तीन बळी घेतले.
मोठ्या लक्ष्यासमोर असताना, दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवरच गारद झाला. कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने सलग दुसरे शतक झळकावले, परंतु संघाला विजयाकडे नेण्यापूर्वीच ती बाद झाली. भारताची अर्धवेळ ऑफ स्पिनर शफाली वर्माने दोन विकेट घेत सामना फिरवला. दरम्यान, दीप्ती शर्माने पाच विकेट घेतल्या आणि संघाचा विजय निश्चित केला. दीप्तीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
२००५ मध्ये, टीम इंडिया पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली, परंतु ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली. २०१७ मध्ये, भारताने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु इंग्लंडने अंतिम फेरीत त्यांचा पराभव केला. २०२५ मध्ये, संघाने पुन्हा सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले, परंतु यावेळी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला हरवून ट्रॉफी जिंकली.