विश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ८ कोटींच्या अपहाराची चौकशी करा; ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा
schedule23 Jun 26 person by visibility 139 categoryउद्योग
कोल्हापूर : विश्वप्रभा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८,४८१ ठेवीदारांचे पैसे अडकले असून, संस्थेत ७.९८ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. याप्रकरणी जबाबदार पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करून ठेवीदारांचे पैसे सुरक्षित करावेत, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र शेटे आणि त्यांच्या नातेवाईकांचा कारभारावर मोठा प्रभाव असून, संस्थेचा वापर वैयक्तिक कामांसाठी केल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. या अपहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी ठेवीदारांनी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली आहे. मात्र, कारवाईत होणाऱ्या विलंबामुळे ठेवीदार संतप्त आहेत.
अनेक वृद्ध, शेतकरी आणि आजारी ठेवीदारांचे पैसे अडकल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने मालमत्ता जप्ती व कायदेशीर कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवराज हेर्लेकर, अनिल मगदूम व उपस्थित ठेवीदारांनी दिला आहे.
यावेळी दिनानाथ माणगांवे, संभाजी पाटील, विवेक भुर्के, डॉ. बाळासो पाटील, कल्पना पाटील, विनय वदडी, सुलोचना वदडी, समर्थ वदडी, धोंडिराम सिद आदी ठेवीदार उपस्थित होते.