राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन २६ जुलै रोजी; कोल्हापुरात २५ शाहू अभ्यासकांना निमंत्रण
schedule22 Jul 26 person by visibility 157 categoryराज्य
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या कृतिशील विचाराने कोल्हापूरची ओळख सामाजिक समतेची नगरी व पुरोगामी विचारची कर्मभूमी म्हणून देशलौकिक आहे. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाराजांचे कार्य व विचारांचे जतन व संवर्धन ताकदीने होण्यासाठी आगामी २६ जुलै रोजी 'राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग सभागृह, शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे रविवारी (२६ जुलै २०२६) रोजी सायंकाळी ५:३० वाजता हे संमेलन पार पडणार आहे. राजर्षी शाहू सलोखा मंच, कोल्हापूरच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
१२५ व्या वर्षारंभाचे औचित्य
यावर्षी राजर्षी शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षण लागू केलेल्या घटनेला २६ जुलै २०२६ पासून १२५ वे वर्ष सुरू होत आहे. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजर्षी शाहू सलोखा मंचाच्या वतीने देण्यात आली.
२५ शाहू अभ्यासकांना विशेष निमंत्रण
गेल्या १०० वर्षांत माधवराव बागल, पी. बी. साळुंखे, आप्पासाहेब पवार, कृ. गो. सूर्यवंशी, विलास संघवे, जयसिंगराव पवार यांसारख्या ज्येष्ठ इतिहासकारांनी प्रदीर्घ काळ राजर्षी शाहूंचा ध्यास घेत अभ्यासपूर्ण लेखन करून मोलाची कामगिरी बजावली आहे. याच ध्यासाचा वारसा जपत सध्या राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर संशोधन, अभ्यास व जतन कार्य करणारे २५ शाहू अभ्यासक व संशोधक यांना या संमेलनाला निमंत्रित करण्यात आले आहे.
यात भाऊसाहेब खणगे, विलास पोवार, टी. एस. पाटील, ए. एम. वैराट, इंद्रजित सावंत, जे. के. पवार, पद्मा पाटील, श्रीराम पचिंद्रे, गणेशकुमार खोडके, अरुण शिंदे, मंजुश्री पवार, शिवाजी जाधव, गिरीश मोरे, नंदकुमार मोरे, देवीकाराणी पाटील, संभाजी बिराजे, कपिल राजहंस, वसंतराव भागवत, चंद्रकांत पाटील, स्वप्नजा घाटगे, सुनील माने, उमेश सूर्यवंशी, राम यादव, अमित आडसुळे, विक्रम रेपे, संदिप मगदूम, शाहिर विजय शिंदे, तसेच हस्तलिखितात नमूद केलेले प्रताप नाईक, संदेश माने आणि नकुल पाटील आदींचा समावेश आहे.
◼️शाहू प्रेमींना उपस्थितीचे आवाहन
संमेलनात राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या संवर्धनावर सखोल चर्चा होणार असून, सर्व शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजर्षी शाहू सलोखा मंचाचे वसंतराव मुळीक (निमंत्रक), बबनराव रानगे (सह निमंत्रक), संजय कांबळे (सचिव) यांच्यासह डी. जी. भास्कर, कादर मलबारी, शशिकांत पाटील, सुखदेव बुध्याळकर, विजय पाटील, शिवमूर्ती झगडे, सोमनाथ घोडेराव, शाहिर दिलीप सावंत, बबन शिंदे आणि अनिल गिरी यांनी केले आहे.