10 तोळे सोन्याच्या जिन्नसांची पिशवी परत करणाऱ्या के.एम.टी. चालक-वाहकांचा सत्कार
schedule30 Jan 26 person by visibility 107 categoryसामाजिक
कोल्हापूर : के.एम.टी. उपक्रमाच्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी हिम्मत पाटील आणि त्यांच्या पत्नी यांची के.एम.टी. बसमध्ये विसरलेली 10 तोळे सोन्याचे जिन्नस असलेली पिशवी प्रामाणिकपणे परत करणाऱ्या वाहक भगवान पांडुरंग पाटील, रा.वाशी, ता.करवीर आणि चालक प्रकाश ज्ञानू झोरे, रा.मोरेवाडी यांचा सत्कार के.एम.टी. उपक्रमाच्या प्रधान कार्यालयात उप आयुक्त परितोष कंकाळ आणि अति.परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांचे हस्ते करणेत आला. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक कृतीबद्दल उप आयुक्त परितोष कंकाळ आणि अति.परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
प्रवासी पाटील हे छ.शिवाजी महाराज चौक ते कसबा बावडा या मार्गावर के.एम.टी. बसमधून प्रवास करीत होते. कसबा बावडा येथे बसमधून उतरतांना ते दागिन्यांची पिशवी अनावधानाने बसमध्येच विसरुन गेले. शुगरमिल येथे शेवटच्या स्टॉपवर गेलेनंतर बसमधील वाहक पाटील यांचे निदर्शनास प्रवाशांची पिशवी विसरलेचे लक्षात आलेनंतर त्यांनी सदरची पिशवी श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे वाहतूक नियंत्रक यांचेमार्फत संबंधीतांना ओळख पटवून परत दिली. त्यानंतर सदर पिशवीत सोन्याचे जिन्नस असलेचे संबंधीत प्रवाशांनी सांगितले. वाहक भगवान पाटील व चालक प्रकाश झोरे यांच्या प्रामाणिक कृतीबद्दल सर्व थरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
सत्कारावेळी वाहतूक निरिक्षक नितीन पोवार, कसुरी विभाग प्रमुख प्रदिप म्हेतर, आस्थापना प्रमुख वानू साबळे, लेखापाल राजू सुर्यवंशी, कामगार अधिकारी संजय इनामदार, मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, एम.डी. कांबळे, उत्तम कांबळे, सागर वंजारे, विवेक साठे व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.