गांधीनगर बाजारपेठेत दिवाळीत भारनियमन नको; करवीर शिवसेनेचा महावितरणला इशारा
schedule27 Oct 26 person by visibility 149 categoryसामाजिक
◼️अखंडित वीजपुरवठा न झाल्यास ‘ढोल बजाओ’ आंदोलनाचा इशारा; महावितरणचे अधिकाऱ्यांकडून सकारात्मक आश्वासन
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी होलसेल व रिटेल बाजारपेठ असलेल्या गांधीनगरमध्ये दिवाळीच्या सणात ग्राहकांची होणारी गर्दी आणि उकाडा लक्षात घेता, बाजारपेठेत कोणत्याही परिस्थितीत भारनियमन किंवा वीज खंडित होऊ नये, अशी ठाम मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन गांधीनगर वीज वितरण कार्यालयाचे सहायक अभियंता सचिन वीर यांना नुकतेच देण्यात आले.
गांधीनगर ही कापड, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक, रेडिमेडसह जीवनावश्यक सर्वच वस्तूंची प्रमुख बाजारपेठ आहे. सध्या ऑक्टोबर हिटचा उकाडा आणि त्यात दिवाळीची खरेदी यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची मोठी वर्दळ सुरू झाली आहे. रस्त्यांवर किरकोळ व फेरीवाले विक्रेतेही मोठ्या संख्येने व्यवसाय करतात. रात्रीच्या वेळी दुकानांसोबतच रस्त्यावरील विक्रेते विजेच्या प्रकाशावर आपला व्यवसाय चालवतात.
याबाबत बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, "दिवाळी सणात वीज खंडित झाल्यास रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्यासोबतच व्यापारावरही मोठा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे महावितरणने वसुलीचे काम बाजूला ठेवून ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना अखंडित वीजपुरवठा द्यावा. अतिरिक्त लोडमुळे वीज खंडित होणाऱ्या ठिकाणी तातडीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी; अन्यथा अधिकाऱ्यांना ढोल वाजवून जागे करण्याचे आंदोलन केले जाईल," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत, गांधीनगर शाखा अभियंता सचिन वीर यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना कडक सूचना देऊन बाजारपेठेत वीज खंडित होणार नाही आणि अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील, अशी दक्षता घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या निवेदनावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, फेरीवाले संघटनेचे उपतालुकाप्रमुख बाळासो नलवडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, विभाग प्रमुख दीपक फ्रेमवाला, उपशहर प्रमुख दीपक अंकल, दीपक धिंग, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी, नमेश चव्हाण, वसंत पोवार, कैलास जाधव, बाबुराव पाटील, रामराव पाटील, धनंजय पाटील, राजू साठे, जितू चावला यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.