अलमट्टीच्या उंचीवाढीविरोधात राज्य सरकार सुप्रिम कोर्टात कधी जाणार आमदार सतेज पाटील यांचा सवाल; तीन हजार हरकतींचे काय केले
schedule04 Jul 25 person by visibility 157 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अलमट्टी धरण उंची वाढ विरोधात राज्य सरकार सुप्रिम कोर्टात जाणार आहे का ? असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी अधिवेशनात उपस्थित केला.
आमदार पाटील म्हणाले, तीन वर्षांपासून वाट पाहत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी, उत्तराखंड संस्थेचा अहवाल कधी मिळणार ? केंद्र सरकारबरोबर बैठकीसाठी दोन वेळा तारखा जाहीर होऊनही त्या बैठका का झाल्या नाहीत ? गरज वाटल्यास राज्य सरकार शिष्टमंडळ पाठवणार आहे का ? असा प्रश्नांचा भडिमारच पाटील यांनी केला.
अलमट्टी उंचीवाढीविरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून तीन हजार हरकती सरकारला मिळाल्या आहेत. त्याचे सरकार काय करणार आहे. वडनेरे समितीच्या अहवालानुसार अलमट्टी धरण हे पुराचे कारण नाही हा मुद्दा सरकारने स्वीकारला आहे का ? असे प्रश्न आमदार पाटील यांनी सरकारला विचारले. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पुरनियंत्रणासंदर्भात दोन्ही राज्यामध्ये समन्वय आहे. या संदर्भातील पुढाकार सरकारने घेतला असून कर्नाटक राज्यातील त्या त्या विभागाशी आम्ही संपर्कात आहोत, असा खुलासा केला.