प्रसारमाध्यमांत मराठी भाषेतील विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी : डॉ.जयप्रभू कांबळे
schedule28 Jan 26 person by visibility 84 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आजच्या बदलत्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात मराठी भाषेतील विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यमांत करिअरच्या अनेक संधी असल्याचे प्रतिपादन गोवा येथील संत सोहीरोबोनाथ अंबिये शासकीय महाविद्यालयातील मराठी विषयाचे डॉ. जयप्रभू कांबळे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या मराठी विषयांतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमांतर्गत ऑनलाईन आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा आणि करिअरच्या संधी’या विषयाच्या व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उपकुलसचिव विनय शिंदे होते. यावेळी विविध महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, समन्वयक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
डॉ.कांबळे म्हणाले, प्रसारमाध्यम लेखन ही एक कला आहे. प्रत्येकाने ती अवगत केली पाहिजे. समाजाभिमुख व उद्दिष्टपूर्ण लेखन करणे, माहिती, जनजागृती व मतनिर्मितीसाठी त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीवर आधारित लेखन करण्यासाठी प्रसार माध्यामात करियरच्या संधी आहेत.
प्रसारमाध्यमांत पत्रकार, वार्ताहर, सहसंपादक, उपसंपादक, संपादक, रेडिओ जॉकी, मुद्रित शोधक, राजकीय विश्लेषक, भाषांतरकार, कंटेंट एडिटर, पटकथालेखक, माहिती अधिकारी, जनसंपर्क अधिकारी इत्यादी अनेक पदांवर विद्यार्थ्यांना संधी आहेत. त्यासाठी भाषिक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय मनोगतात उपकुलसचिव विनय शिंदे म्हणाले की, मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांनी नोकरी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य आत्मसात केली पाहिजेत.
यावेळी डॉ. नगिना माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुप्रिया मोगले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ.प्रवीण लोंढे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ.नितीन रणदिवे यांनी आभार मानले.