शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू
schedule22 Sep 26 person by visibility 129 categoryराज्य
कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटद्वारे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुषंगाने पुणे विभागातील संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. मतदान २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून, मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहिता नियमावलीचे काटेकोर पालन होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.