माहिती विभागाचे छायाचित्रकार यमकरांचा निवृत्ती निमित्त सत्कार
schedule31 Jan 26 person by visibility 163 categoryसामाजिक
कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छायाचित्रकार अनिल मालोजी यमकर यांची 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस जानेवारीला निवृत्ती झाली.कोल्हापूर येथील माहिती विभागाच्या दोन्ही कार्यालयाच्या वतीने तसेच जिल्ह्यातील माध्यम क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
माहिती विभागातील छायाचित्रकार म्हणून गेली अनेक वर्ष ते कार्यरत होते. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरापासून तर सर्व महत्त्वाच्या घटनाक्रमाचे शासकीय छायाचित्रकार म्हणून ते सक्रियपणे कार्यरत होते. अनेक दशकांचा कोल्हापूरचा इतिहास त्यांच्या नजरेतून कॅमेराबद्ध झाला आहे.
माहिती जनसंपर्क विभागाच्या विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये आज जिल्हाधिकारी श्री.अमोल येडगे,माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त उपसंचालक वसंत शिर्के,सध्याचे उपसंचालक प्रवीण टाके, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष समीर देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ,सांगली जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर,यमकर यांच्या पत्नी सौ. अंकिता यमकर यांच्या उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमात त्यांना सपत्नीक निरोप देण्यात आला.त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीवर बनवलेली चित्रफीत विशेष उल्लेखनीय ठरली.
या कार्यक्रमाला यमकर यांचे बालमित्र,आप्तेष्ट,कौटुंबिक सदस्य,तसेच माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे,शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर,विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रताप नाईक,महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले,माहिती अधिकारी एकनाथ पोवार,सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदीवाडेकर,शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख रत्नाकर पंडित,निवृत्त माहिती अधिकारी सखाराम माने,दिलीप घाटगे यांच्यासह विविध वृत्तवाहिन्या,वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तसेच छायाचित्रकार व कॅमेरामन उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी अनिल यमकर यांनी गेल्या 35 वर्षात माहिती विभागाच्यावतीने केलेल्या जनसंपर्काचे कौतुक केले.माहिती विभागाचे स्थानिक संपर्क अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख होती.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या वक्तशीरपणाचे व सातत्याचे यावेळी कौतुक केले.तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विविध विभागाच्या अधिकारी व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना यमकरांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा उपसंचालक प्रवीण टाके यांनी विशेष उल्लेख केला.माजी उपसंचालक वसंत शिर्के यांनी त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचे कौतुक केले. अन्य मान्यवरांनी देखील यमकर हे माहिती व जनसंपर्क विभागाचे स्थानिक ब्रँड अँबेसिडर झाले होते अशा शब्दात त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसंपादक रणजीत पवार यांनी केले.