निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची अनियमितता नको : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule31 Jan 26 person by visibility 103 categoryराज्य
• कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान कामकाजात अचूकता राखण्यासाठी मार्गदर्शन
• तालुक्यांचा दौरा करीत निवडणूक यंत्रणेचा प्रत्यक्ष घेतला आढावा
कोल्हापूर : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि कागल या तालुक्यांचा दौरा करून निवडणूक यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी मतदान यंत्रांची सुरक्षा, स्ट्राँग रूमची व्यवस्था आणि आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर विशेष भर दिला. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात उपस्थित राहून कामकाजात अचूकता राखत जबाबदारीने एक टीम म्हणून काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सुरु असलेल्या टपाली मतदान ठिकाणीही भेट देत कामकाजाची पाहणी केली.
जिल्हाधिकारी येडगे यांनी प्रत्येक तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांना भेटी देऊन निवडणूक कामकाजाची सखोल पाहणी केली. विशेषतः मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम्सच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी कडक सूचना दिल्या. यंत्रांचे सीलिंग, सीसीटीव्ही कव्हरेज आणि २४x७ सशस्त्र पहारा यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, स्ट्राँग रूम उघडणे-बंद करणे किंवा यंत्रांची वाहतूक करणे यांसारख्या संवेदनशील प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच पार पाडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
प्रचार प्रक्रियेबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आदर्श आचारसंहितेचे पालन करणे सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक आहे. प्रचारादरम्यान सामाजिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करू नये. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी भिंतीवर पोस्टर्स लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी 'एक खिडकी योजना' कार्यान्वित करण्यात आली असून, याद्वारे सभा आणि प्रचाराच्या परवानग्या सुलभतेने दिल्या जात आहेत. मात्र, विनापरवाना सभा किंवा रॅली काढल्यास त्वरित कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी २४१ उमेदवार, तर १२ पंचायत समित्यांच्या १३६ गणांसाठी ४५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी नियोजित आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवर पाणी, वीज, रॅम्प आणि स्वच्छतागृहे यांसारख्या किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
▪️जिल्हास्तरीय माध्यम कक्षाला भेट
निवडणूक प्रक्रियेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा माहिती कार्यालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी 'पेड न्यूज' आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराबाबत सुरू असलेल्या कामकाजाची बारकाईने पाहणी केली. उमेदवारांच्या प्रचारासाठी बातम्यांच्या स्वरूपात येणाऱ्या जाहिरातींवर (पेड न्यूज) कडक लक्ष ठेवावे. अशा बातम्या आढळल्यास जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन आणि सनियंत्रण समितीकडे त्वरित अहवाल सादर करावा, जेणेकरून त्याचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करता येईल. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) यांसारख्या प्लॅटफॉर्मवर निवडणुकीशी संबंधित अफवा, चिथावणीखोर पोस्ट किंवा आचारसंहितेचा भंग करणाऱ्या मजकुरावर २४ तास लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या भेटीवेळी उपसंचालक प्रविण टाके, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ आणि माध्यम कक्षाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.