पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याचे आवाहन
schedule07 Aug 26 person by visibility 78 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 मधील प्राप्त गुणांच्या आधारे ही भरती करण्यात येत असून, उमेदवारांनी पदनिहाय प्राधान्यक्रम नोंदवून तो निर्धारित मुदतीत लॉक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 ही ऑनलाइन पद्धतीने दि. 27 मे ते 5 जून 2025 या कालावधीत घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2 लाख 28 हजार 808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले असून, 1 लाख 70 हजार 108 उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातींनुसार राज्यात एकूण 30 हजार 209 रिक्त पदे उपलब्ध झाली आहेत. यामध्ये जिल्हा परिषदांच्या 13 हजार 351, महानगरपालिकांच्या 1 हजार 954, नगर पालिका/परिषदांच्या 280, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील 2 हजार 421, शासकीय विद्यानिकेतनमधील 56 आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील 12 हजार 148 पदांचा समावेश आहे.
पदनिहाय विचार करता इयत्ता 1 ली ते 5 वीकरिता 14 हजार 320, इयत्ता 6 वी ते 8 वीकरिता 10 हजार 12, इयत्ता 9 वी ते 10 वीकरिता 5 हजार 513 आणि इयत्ता 11 वी ते 12 वीकरिता 364 पदे उपलब्ध आहेत.
उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर लॉगिन करून प्राधान्यक्रम जनरेट करावा. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा 6 ऑगस्ट पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी आपला पदनिहाय पसंतीक्रम 6 ते 11 ऑगस्ट या कालावधीत नोंदवून लॉक करणे आवश्यक आहे.
प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय भरतीच्या प्रकारातील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पदभरतीसंदर्भातील सूचना तसेच प्राधान्यक्रमाबाबत उमेदवारांना पोर्टलवर माहिती देण्यात आली असून, SMS द्वारेही कळविण्यात येत आहे.
पवित्र पोर्टलवरील पदभरतीसंदर्भातील आपले म्हणणे अथवा मागणी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.