ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन
schedule02 Jan 26 person by visibility 89 categoryसामाजिक
सातारा : भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या संजय दुधाणे लिखित चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त करण्यात आले.
शाहू स्टेडियममधील साहित्य संमेलनाच्या प्रकाशन मंचावर संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते ऑलिम्पिकवीर खाशाबा पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, लेखक प्रा. संजय दुधाणे, मिलिंद जोशी, सुनीताराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत साताराचे सुपुत्र खाशाबा जाधव यांनी कुस्ती खेळात देशासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते. त्याच्या ही ऐतिहासिक यशोगाथा 2000 मध्ये क्रीडा लेखक संजय दुधाणे यांनी सर्वप्रथम लोकांसमोर आणली. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने हे पुस्तक केंद्र शासनाच्या नॅशनल बुक ट्रस्टनेही प्रकाशित केले होते. मराठीसह हिंदीमध्येही हे पुस्तक उपलब्ध आहे. पुस्तकाची रौप्यमहोत्सवी वाटचाल यंदा पूर्ण होत आहे.
88 पानी चरित्र पुस्तक खाशाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांनी सजले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 150 रूपये किंमतीचे चरित्र 100 रुपयांत पुस्तक प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा शाहू महाराज पुरस्काराने गौरवित झाले असून इयत्ता 9वी नंतर आता इयत्ता 6 वीच्या पाठ्यपुस्तकातही या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे.
क्रीडालेखक संजय दुधाणे यांची आतापर्यंत 21 पुस्तक प्रकाशित झाली असून सातार्याचे ऑलिम्पिकपटू श्रीरंग जाधव यांचे चरित्र लेखनही दुधाणे यांनी केले आहे.





