आदिवासींनी केलेल्या बांबूच्या राख्यांना शिवाजी विद्यापीठात प्रतिसाद
schedule29 Aug 26 person by visibility 140 categoryसामाजिक
कोल्हापूर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांचा प्रसार, प्रसिद्धी आणि विक्रीच्या कामी शिवाजी विद्यापीठाच्या स्वयंसिद्धाच्या माध्यमातून आणि यु. जी. सी. स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटी केंद्राकडून मोठा हातभार लाभला.
राबविलेल्या या उपक्रमांतर्गत सुमारे ४५०० रुपयांच्या राख्यांची विक्रीही करण्यात केंद्राला यश आले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन उपक्रमही घेण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'सेवा विवेक' ही संस्था अग्रेसर आहे. तेथील आदिवासी महिलांनी बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केलेल्या आहेत. बांबूपासून तयार केलेल्या राख्या खूप सुंदर व सुबक आहेत. पारंपारिक राखीला पर्यावरणपूरक आणि आकर्षक पर्याय म्हणून बांबूच्या राख्यांकडे पाहिले जाते. महिलांना स्वयंरोजगारातून सक्षमीकरण करण्यासाठी, त्या महिलांनी तयार केलेल्या राखी विकत घेऊन त्यांच्या या कार्याला हातभार विद्यापीठामध्ये 'स्वयंसिद्धा' केंद्राच्या सहकार्यातून लावण्यात आला आहे. या राख्या विद्यापीठातील अधिविभाग व महाविद्यालयांतील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विकत घेतल्या. समाजशास्त्र अधिविभाग, शिक्षणशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थिनी वसतिगृहातील विद्यार्थिनींनी या राख्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या. जयवंत महाविद्यालय इचलकरंजी यांनीदेखील मोठ्या संख्येने राख्या खरेदी केल्या.
स्वयंसिद्धा केंद्राच्या आणि यु. जी. सी. स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. विद्यापीठातील स्वयंसिद्धाच्या समन्वयक डॉ. प्रतिभा बा. देसाई, दीप्ती कांबळे यांनी या उपक्रमास विशेष योगदान दिले.