५ सप्टेंबरला रंगणार युवाशक्ती दहीहंडीचा थरार, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ३ लाख रूपयांचे बक्षीस
schedule29 Aug 26 person by visibility 238 categoryसामाजिक
◼️५ थरांपासून ते ८ थरांची सलामी देणार्या संघांना आकर्षक बक्षिसे
कोल्हापूर : कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख रूपयांचे बक्षिस पटकावण्यासाठी, यंदाही गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यंदाही युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. तर स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.
पहिल्याच प्रयत्नात पाच थर लावून सलामी देणार्या गोविंदा पथकाला प्रोत्साहन म्हणून ५ हजार रूपये दिले जातील. तर सहा थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १० हजार रूपये आणि सात थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तर ८ थर लावणार्या गोविंदा पथकाला १ लाख रूपयांचं बक्षिस दिलं जाणार आहे. शिवाय भागीरथी महिला संस्थेकडून सर्व गोविंदा पथकांसाठी फुड पॅकेट वितरीत केले जाणार आहे. त्यामुळे गोविंदांच्या भोजनाची सोय भागीरथी संस्थेकडून होणार आहे.
तसेच सर्वात वरच्या थरावर चढून, दहीहंडी फोडणार्या गोविंदाच्या सुरक्षेेसाठी, दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विशेष सुरक्षेचे उपाय केले जातील. त्यासाठी समीट ऍडव्हेंचरचे विनोद काम्बोज आणि हिल रायडर ऍडव्हेंचर फौंडेशनचे प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. शिवाय एखादा गोविंदा जखमी झाल्यास, त्याच्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी समीट ऍडव्हेंचरचे आणि हिल रायडर ऍडव्हेंचरसह व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते सज्ज असतील. तसेच सीपीआर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक सज्ज असेल.
दहीहंडी फोडणारा सर्वात वरच्या थरावरील गोविंदा १४ वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. तर सर्व गोविंदांना १० लाख रूपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच असणार आहे. युवाशक्ती दहीहंडीच्या निमित्ताने छायाचित्रण स्पर्धाही आयोजित केली आहे. सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना अनुक्रमे ७, ५ आणि ३ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. तसेच युवाशक्ती दहीहंडी रिल्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात येत आहे.
सर्वोत्तम रिल्स बनवणार्यांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिले जातील. प्रारंभी स्वराज्य ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृतिक कार्यक्राम सादर होईल. शासनाने दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून, स्पर्धेचे आयोजन होणार आहे. स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या क्रीडापटूंचा सत्कार होणार आहे. दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर, युवाशक्ती दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन करण्यात आलेे आहे. डिजे रणजितसह, उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असेल. शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण होईल. युवाशक्ती दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी युवाशक्ती दहीहंडीच्या तयारी आणि नियोजनासाठी आढावा बैठक घेतली असून, भाजप आणि युवाशक्तीचे सुमारे २५० कार्यकर्ते दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहीहंडीचा आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूर वासियांनी ५ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, नगरसेवक वैभव कुंभार, प्रमोद पाटील, विनोद काम्बोज, सागर बगाडे, उत्तम पाटील, विजय टिपुगडे, राजेंद्र बनसोडे, झाकीर जमादार, उदय चव्हाण, उमेश पाटील, अमित पालोजी, विनायक सुतार उपस्थित होते.