सिद्धार्थनगरातील दंगल : दोन्ही गटांतील ४०० जणांवर गुन्हा; बंदोबस्त कायम
schedule24 Aug 25 person by visibility 204 categoryगुन्हे

कोल्हापूर : सिद्धार्थनगर कमानीजवळ भारत तरुण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त लावलेले फलक आणि साउंड सिस्टमच्या वादातून झालेल्या दगडफेकप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही गटांतील सुमारे ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. यातील ३१ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, दोन्ही गटांनी समजुतीची भूमिका घेतल्याने शनिवारी (दि. २३) तणाव निवळला. दगडफेकीत सात वाहनांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचे समजते. परिसरात पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला आहे.
शुक्रवारी दोन गटांतील वादाचे पर्यवसान दगडफेक आणि जाळपोळीत झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आणून दोन्ही गटांतील सुमारे ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करणे, मालमत्तांचे नुकसान करणे, शस्त्रे नाचवून दहशत माजवणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आहेत.
दरम्यान अधीक्षक कार्यालयातील बैठकीत पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दोन्ही गटांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. बैठकीत दोन्ही गटांतील नेत्यांनी सलोखा कायम राखण्याचे आश्वासन दिले. आरपीआयचे उत्तम कांबळे, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई, विकी कांबळे, रजनिकांत सरनाईक, स्वप्निल पन्हाळकर, जय पटकारे, डॉ. शशिकांत खोडशे, स्वाती काळे, सीमा कांबळे. माजी नगरसेवक आदिल फरास, रियाज सुभेदार, नंदकुमार मोरे, कादर मलबारी, जाफर बाबा, शकील नगरजी, इसाक पठाण, मुस्ताक मलबारी यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या.