संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्न
schedule11 Aug 26 person by visibility 162 categoryशैक्षणिक
◼️पालकांचे स्वप्न करिअरच्या यशातून साकार करा” : विश्वस्त विनायक भोसले
अतिग्रे : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘प्रारंभ २०२६’ हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दहावीनंतर अभियांत्रिकी शिक्षणाच्या नव्या पर्वात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेची शैक्षणिक संस्कृती, उपलब्ध सुविधा, करिअरच्या विविध संधी आणि भविष्यातील वाटचालीची दिशा समजावी, तसेच विद्यार्थी, पालक आणि संस्था यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट निकाल देणाऱ्या प्राध्यापकांच्या कार्याचेही कौतुक करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. रणजीत शिरोडकर, ऍडमिशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. नितीन जाधव विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना पालकांच्या कष्टांची आणि अपेक्षांची जाणीव ठेवून शिक्षण, शिस्त आणि कौशल्यविकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “पालकांनी पाहिलेले स्वप्न केवळ प्रमाणपत्र मिळवून नव्हे, तर उत्तम करिअर घडवून आणि यशस्वी होऊन साकार करा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी विवध क्षेत्रांचा विचार करून आपल्या भविष्यातील करिअरचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नीती मूल्यांचा अंगीकार करून ध्येय निश्चित करावे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ते साध्य करावे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा आपल्या कर्तृत्वातून स्वतःची ओळख निर्माण करा, अपयशाला न घाबरता सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. विश्वस्त भोसले यांनी विविध पेरणात्मक उदाहरणे देऊन विद्यार्थी व पालकांची मन जिंकली.
संचालक डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थी, पालक आणि संस्था यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या नियमांचे पालन करून सातत्याने अभ्यास करावा, उपलब्ध सुविधांचा योग्य वापर करावा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये संस्थेसोबत सक्रिय सहभाग ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. डिप्लोमा शिक्षणानंतर उच्च शिक्षण, रोजगार तसेच उद्योजकतेच्या उपलब्ध संधींची. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता या तीनही क्षेत्रांचा विचार करून आपल्या भविष्यातील करिअरचे नियोजन करावे, असा संदेश डॉ. गिरी यांनी दिला. संस्थेतील अत्याधुनिक सुविधा, प्रयोगशाळा, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थांना करण्यात आले. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शिस्त, वेळेचे नियोजन, सकारात्मक विचारसरणी आणि कौशल्यविकासाला महत्त्व देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी पालक शिंगे, जॉर्ज क्रूज, सौ. सुनीता यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या शैक्षणिक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले. नव्या विद्यार्थ्यांच्या मनातील महाविद्यालयीन जीवनाबाबतची उत्सुकता, अपेक्षा आणि काहीशी असलेली भीती दूर करून त्यांना आत्मविश्वास देणारा हा कार्यक्रम ठरला. ‘प्रारंभ २०२६’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या डिप्लोमा शिक्षणाच्या प्रवासाची सकारात्मक आणि प्रेरणादायी सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बेसिक सायन्स विभागप्रमुख प्रा. रणजीत शिरोडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री भालकर यांनी केले, तर आभार विनीत जाखलेकर यांनी मानले. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.