SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘क्रांतिज्योती’ची पोरं महाराष्ट्रभर ठरली सुपरहिट!ऊसतोड मुजरांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात : जिल्हाधिकारी अमोल येडगेआमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांनी शिवसेनेतील बंडखोरी शमली सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानासाठी PB-1 फॉर्म शनिवारी दुपारपर्यंत जमा करावेतकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक तयारीचा आढावा ; प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे महत्त्वपूर्ण निर्देश शासकीय जनआरोग्य योजनांतून कोणालाही उपचार नाकारू नयेत : सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरगृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन

जाहिरात

 

सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

schedule03 Jan 26 person by visibility 72 categoryसामाजिक

भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्ये यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक थोर समाजसुधारक, कवयित्री आणि परिवर्तनाच्या सर्वकालीन प्रतिक आहेत.  ज्या काळात स्त्रीने शिकणे पाप मानले जात होते, त्या काळात त्यांनी शिक्षणाचा दिप प्रज्वलित करुन सामाजिक अज्ञानाच्या अंधाराला आव्हान दिले. स्वत:च्या आयुष्याला आकार देतानाच भारतीय स्त्री- शिक्षणाच्या पायाही त्यांनी घातला.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे शेतकरी होते. बालवयातच त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला.  ज्योतिराव यांच्या परिवर्तनवादी झंझावाताला गती देणाऱ्या आदर्श पत्नी म्हणून त्या इतिहासात अमर झाल्या.  त्या काळातील रूढीप्रमाणे सावित्रीबाई अशिक्षितच होत्या; मात्र ज्योतिराव फुले यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. पतीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रथम घरीच शिक्षण घेतले आणि पुढे पुण्यात शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केले.  संस्कृती, शालिनता, शिस्त व आधुनिकता याचा मिलाप म्हणजे सावित्रीबाई फुले.

१८४८ साली पुण्यात भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून सावित्रीबाई फुले यांनी इतिहास घडवला. त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. तो काळ स्त्री शिक्षणाच्या विरोधाचा होता. सावित्रीबाईंना शाळेत जाताना रस्त्यावरून जाताना लोक शिवीगाळ करीत, दगड-शेण फेकत; तरीही त्यांनी हार मानली नाही. त्या शाळेत जाताना नेहमी एक अतिरिक्त साडी बरोबर ठेवत, अपमान सहन करूनही त्या शिक्षणाच्या कार्यात अविरत कार्यरत राहिल्या.  त्या शिक्षण घेणाऱ्या, शिक्षण देणाऱ्या आणि शिक्षण प्रसार-प्रचार करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

स्त्री शिक्षणासोबतच सावित्रीबाई फुले यांनी दलित, शूद्र-अतिशूद्र अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. त्यांनी स्त्रियांसाठी, मागासवर्गीयांसाठी आणि दुर्लक्षित घटकांसाठी शिक्षणाची दारे उघडली. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता यांना त्यांनी निर्भीडपणे विरोध केला. विधवाविवाह, पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, अनाथ बालकांचे संगोपन अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मार्ग दाखवला.  जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद साऱ्याच भेदांचा चक्रव्यूह फोडून त्यांनी दीडशे वर्षापूर्वी सर्व धर्म,जात,पंथातील मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला.
सावित्रीबाई फुले या एक संवेदनशील कवयित्रीही होत्या. त्यांच्या कविता समाजप्रबोधन करणाऱ्या होत्या. ‘काव्यफुले’ आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ व अन्य त्यांचे ग्रंथ सामाजिक परिवर्तनाचा संदेश देतात. त्यांच्या लेखनातून शिक्षणाचे महत्त्व, आत्मसन्मान, स्त्री स्वातंत्र्य आणि मानवतावाद यांचा आग्रह दिसून येतो.
सावित्रीबाई फुले यांनी तत्कालिन समाजव्यवस्थेच्या काही अंध रुढी परंपरा पाळल्या नाहीत.  त्यासाठी समाजाच्या रोषाला त्या बळी पडल्या. मात्र आज पासून दीडशे वर्षांपूर्वीचा त्यांचा संघर्ष महिलांसाठी आजही प्रेरणादायी आहेत.  त्यांना अपत्य नव्हते.  त्याकाळात अपत्य नसणारी माताही समाजाला सहन व्हायची नाही.  मात्र समाजाच्या नावे ठेवण्याची, टोमण्याची पर्वा न करता जैविक मूल नसताना त्यांनी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेतले.  त्याचे संगोपन केले. त्याला पुढे डॉक्टर केले.  हा मुलगा देखील त्यांच्यापर्यंत एका क्रांतीकारी निर्णयातून पोहचला. ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी त्या काळात बालहत्या प्रतिबंधक गृह केंद्र सुरु केले.  शोषित विधवांच्या, असाह्य मातांना, कुमारी मातांना समाजात मरण यातना भोगाव्या लागणारा तो काळ.  त्याकाळात या दांम्पत्यांनी हे बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले.  या आश्रय गृहातील विधवेला झालेला ‘यशवंत’ हा त्यांनी पुढे दत्तक घेतला.  त्यामुळे स्वत:  निपुत्रिक असणे हे कोणतेही पाप नाही.  विधवांना संरक्षण देणे समाजविरोधी नाही.  मुलगा दत्तक घेणे ही एक आदर्श उपाययोजना आहे, असा वस्तूपाठ घालण्याचा निर्णय दीडशे वर्षापूर्वी घेतलेली सावित्री आजही आमच्या समाजाला प्रेरणादायी आहे. 
महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यात सावित्रीबाई फुले यांचा सक्रिय सहभाग होता. समाजातील अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळावा, समतेवर आधारित समाजनिर्मिती व्हावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे चालू ठेवले.

१८९६-९७ साली पुण्यात प्लेगची भीषण साथ पसरली. त्या काळात समाजातील अनेक लोक आजारी लोकांपासून दूर पळत असताना सावित्रीबाई फुले यांनी मात्र प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करण्याचा कणखर निर्णय घेतला. त्यांनी स्वतः रुग्णांना खांद्यावर घेऊन रुग्णालयात दाखल केले. याच सेवाकार्यादरम्यान त्यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. मानवतेच्या सेवेतील हे त्यांचे  शेवटचे पण अत्युच्च बलिदान ठरले.
सावित्रीबाई फुले यांचे जीवन हे संघर्ष, करुणा, धैर्य आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे. त्यांनी स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, समाजाला विचार करायला शिकवले आणि समानतेचा मार्ग दाखवला. 
सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य आजही तितकेच समर्पक आणि प्रेरणादायी आहेत. शिक्षण, समानता आणि मानवता या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी त्यांचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरते.

🔸सावित्रीबाई फुले  जीवनपट
▪️पूर्ण नाव : सावित्रीबाई ज्योतिराव फुले
▪️जन्मतारीख : ३ जानेवारी १८३१
▪️जन्मगाव : नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, महाराष्ट्र
▪️वडिलांचे नाव : खंडोजी नेवसे पाटील
▪️पतीचे नाव : महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले
▪️कार्य / योगदान :
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका
पुणे येथे पहिली मुलींची शाळा (१८४८) सुरू केली
स्त्री शिक्षण, दलित शिक्षण व शूद्र-अतिशूद्र समाजाच्या उन्नतीसाठी कार्य
बालहत्या प्रतिबंध, विधवाविवाह, स्त्री-पुरुष समानता यांसाठी समाजसुधारणा
सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग
प्लेग साथीच्या काळात रुग्णसेवा
▪️मृत्यू :
१० मार्च १८९७
पुणे, महाराष्ट्र
(प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करताना संसर्गामुळे निधन)
▪️ओळख :
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका
थोर समाजसुधारिका, कवयित्री व शिक्षणतज्ज्ञ
महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडून गौरविलेले व्यक्तिमत्त्व

✍️ प्रवीण टाके, 
(उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर)

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes