कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक तयारीचा आढावा ; प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे महत्त्वपूर्ण निर्देश
schedule02 Jan 26 person by visibility 68 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदान जनजागृती मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.
शहरातील रुग्णालये तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरात मतदारांसाठी ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्याचे आदेश देण्यात आले. एफएसटी (फ्लाईंग स्क्वॉड) पथकांनी दैनंदिन अहवाल सादर करावा, मद्यवाहतूक तपासणीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत करावी. तपासणी नाक्यावर दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांची कसून तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या. एसएसटी पथकांनी प्रचार रॅलींवर विशेष लक्ष केंद्रित करावे.
मतदान केंद्राबाहेर मतदान केंद्र क्रमांकाची माहिती स्पष्टपणे प्रदर्शित करणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी व्हीलचेअर्सचे नियोजन करणे, तसेच मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासकांनी दिले. वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्याबरोबरच मतमोजणी पथकांचे प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या.
पेड न्यूज व जाहिरातींच्या खर्चावर विशेष लक्ष ठेवणे, सर्व केंद्रांवर व सर्व स्ट्राँग रूम ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बिद्रे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर, रचना व कार्यपद्धती अधिकारी प्रशांत पंडत, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आदी अधिकारी उपस्थित होते.





