बहिरेश्वर येथे दूध संस्थेचा श्रावणी उपक्रम; सभासदांना लाखोंचा लाभ
schedule18 Aug 25 person by visibility 248 categoryउद्योग

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील दुधाची पंढरी म्हणून विशेष ओळख असलेल्या बहिरेश्वर गावातील श्री शेष नारायण सहकारी दूध संस्था मर्या. यांच्या वतीने श्रावण सोमवार श्रीकृष्ण यात्रेनिमित्त सभासदांना एकूण ₹५,७३,००० इतकी बचत ठेव मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
दुग्धोत्पादनामुळे बहिरेश्वर गावात धवलक्रांती घडली आहे. जिल्ह्याची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाला जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकावर दूध पाठवणारे हेच गाव असून, येथे पांडवकालीन श्रीकृष्ण मंदिर आहे. गावातील युवक मोठ्या संख्येने दुग्ध व्यवसायात गुंतलेले असल्याने ‘दही-दूधाचे बहिरेश्वर’ अशी या गावाची खास ओळख आहे.
गोकुळ दूध संघाकडून दर दहा दिवसांनी दूधबिल थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाते. या बिलातून संस्था वर्षभर प्रत्येक सभासदाकडून ठराविक रक्कम कपात करून ठेव स्वरूपात जमा करते आणि तीच रक्कम यात्रेच्या निमित्ताने सभासदांना परत देते. “सभासदांना यात्रेसाठी आर्थिक मदत व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे,” असे सचिव उत्तम दिंडे यांनी सांगितले.
संस्थेकडून केवळ बचत ठेवच नव्हे, तर दिवाळी बोनस म्हणून म्हैस दूध व गाय दूध यासाठी स्वतंत्र बोनसही दिला जातो. त्यामुळे गावातील युवकवर्ग दुग्ध व्यवसायात उत्साहाने सहभागी होत आहे. सभासदांमध्ये जास्त दूध पुरवठ्यासाठी चढाओढ असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माजी सरपंच पी. आर. पाटील यांनी केले. यावेळी चेअरमन, उपाध्यक्ष, सर्व संचालक, सचिव, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सचिव उत्तम दिंडे यांनी मानले.