संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन
schedule11 Feb 26 person by visibility 97 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजय घोडावत एआय संशोधन केंद्र (SGAiRC) चे उद्घाटन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सी-ब्लॉक येथील सेमिनार सभागृहात संपन्न झाले. या उद्घाटन समारंभास संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
याच दिवशी “इंडिया एआय अभियान” सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित पूर्व संमेलन कार्यक्रम ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ चे ही उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नामवंत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, नवसंकल्पना, संशोधनाच्या संधी तसेच भारतातील एआयचे भवितव्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रुती पाटील संचालिका, सिम्बायोसिस कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था, पुणे, श्री. हर्षवर्धन सालुंखे उपाध्यक्ष, व्हीसी टेक्नॉलॉजीज, कोल्हापूर, अनुप कारेकर संशोधन प्रमुख अवकाश व प्रगत संशोधन, व्यापारीकरण व तंत्रज्ञान प्रा. लि.; आंतरराष्ट्रीय खगोल व अंतराळ संघटनेचे राजदूत, तसेच आशुतोष पवार वरिष्ठ संगणक प्रणाली अभियंता, रिव्होल्युशन आयटी सोल्युशन्स यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विराट व्ही. गिरी, कॉम्पुटर विज्ञान व अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विराट गिरी यांनी केले. “एआय संशोधन केंद्राचे महत्वाचे कार्य कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व, भविष्यातील संशोधन संधी आणि आवश्यक कौशल्यांवर सविस्तर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये भविष्यातील शास्त्रज्ञ आणि संशोधक घडविण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण व संशोधन अत्यंत आवश्यक असून हे कार्य संस्था प्रभावीपणे करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाच्या नव्या युगाची सुरुवात करणारे SGAiRC संशोधन केंद्र आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ हे दोन्ही उपक्रम विद्यार्थी, संशोधक व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणारे असून उपस्थितांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीचा भाग होण्याचे आवाहन त्यांनी केले.
हा संपूर्ण कार्यक्रम इन्स्टिट्यूटच्या कॉम्पुटर विज्ञान व अभियांत्रिकी विभागांतर्गत आयोजित करण्यात आला होता. विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सिद्धी जोशी हिने केले, तर प्रा. सागर चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.