पंचगंगा–कृष्णा संगमावर ‘गोदा ते नर्मदा’ जलदिंडीसाठी पवित्र जलकलश पूजन; आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
schedule25 Apr 26 person by visibility 184 categoryराज्य
नृसिंहवाडी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवडा २०२६ अंतर्गत ‘गोदा ते नर्मदा’ जलदिंडीसाठी पंचगंगा–कृष्णा संगमातील पवित्र जलकलशाचे पूजन आज नृसिंहवाडी येथे संपन्न झाले. हा पूजन सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडला.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या संकल्पनेतून, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांसह ‘गोदा ते नर्मदा’ जलदिंडी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या जलदिंडी अंतर्गत कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील नद्यांमधील पवित्र जलकलश स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते जलसंपदा विभागाकडे सुपूर्त करण्यात येणार आहेत. हे सर्व कलश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थान असलेल्या चौंडी मार्गे शिर्डी येथे एकत्रित केले जाणार असून, पुढे मध्यप्रदेशातील महेश्वर येथे या जलदिंडीची सांगता होणार आहे. सदरील जलदिंडी दि. २५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
आज झालेल्या कार्यक्रमात पूजित जलकलश उपविभागीय अधिकारी प्रकाश येसणे (शिरोळ पाटबंधारे उपविभाग) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी येसणे यांनी जलव्यवस्थापन पंधरवड्याच्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट करत विविध उपक्रमांची माहिती दिली.
या प्रसंगी आमदार यड्रावकर यांनी जलव्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करत शिरोळ तालुक्यातील नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी जलसंधारण, पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास श्री दत्त देवस्थान ट्रस्ट, नृसिंहवाडीचे अध्यक्ष गुंडो पुजारी, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, शिरोळ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने, कुरुंदवाड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शरद आलासे, बाळासाहेब माने विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत जोंग यांच्यासह जलसंपदा विभागाच्या कुरुंदवाड, इचलकरंजी, वडगाव, कुंभोज व नृसिंहवाडी शाखांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली कुंभार यांनी केले.