येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटन
schedule16 Nov 25 person by visibility 50 categoryआरोग्य
छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षण, उपचारात वापर, संशोधन अशा विविध प्रकारे चालना दिली असून येणारा काळ हा आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
येथील सातार तांडा भागातील श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, श्रीयश प्रतिष्ठानचे बसवराज मंगरुळे,सचिव संगिता मंगरुळे, रुग्णालय अधीक्षक डॉ. परेश देशमुख, अधिष्ठाता स्वाती इटगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय जीवनपद्धतीस अनुकूल व निसर्गाशी साधर्म्य सांगणारी ही उपचार पद्धती वेदांमध्ये आयुर्वेद या नावाने सांगण्यात आली आहे. आजाराच्या लक्षणांवर नव्हे तर मुळाशी जाऊन आयुर्वेदात उपचार केले जातात. ही उपचार पद्धती शाश्वत उपचार पद्धती आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीचा जगभरात वापर वाढत आहे. भारतात आयुर्वेद उपचार पद्धतीने उपचार घेण्यासाठी अनेक लोक येत आहेत. आयुर्वेदाने या जगाला विज्ञाननिष्ठ उपचार पद्धती देऊन शल्यचिकित्सा पद्धतीही दिली आहे.
कोविड काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पूरक औषधांमध्ये आयुर्वेदीक औषधींचा सर्वाधिक समावेश होता. केंद्र सरकारमार्फत या उपचार पद्धतीला प्रोत्साहन दिले जात आहे. प्रशिक्षित वैद्य तयार करण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयांना चालना दिली जात आहे. आगामी दशकात भारत हा जगातली प्रमुख अर्थव्यवस्था बनून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ पहात आहे. 2047 पर्यंत आपला देश आर्थिक महासत्ता झालेला असेल. मराठवाड्यातही आपण उद्योग क्षेत्राला पाठबळ देत असून इलेक्ट्रिक व्हेईकलची कॅपिटल म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख निर्माण होत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.