उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई सुरूच ठेवण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांचे निर्देश
schedule28 Sep 26 person by visibility 123 categoryमहानगरपालिका
◼️पाणीपट्टी व दंडात्मक कारवाईतून ८६ लाख, अस्वच्छता व उपद्रव कारवाईतून १३ लाखांची वसुली उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
कोल्हापूर : शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व नागरी शिस्त अबाधित ठेवण्यासोबतच महापालिकेची थकबाकी वसुली आणि अनधिकृत पाणी कनेक्शनवर प्रभावी कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपद्रव शोध पथकाच्या कामकाजाचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज घेतला. आयुक्त कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीत त्यांनी पथकांना धडक कारवाई करुन वसुलीचे उद्दिष्ट वाढविण्याच्या सूचना दिल्या.
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत प्लास्टिकचा वापर करणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, उघड्यावर लघुशंका करणारे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे, रस्त्यावर खरमाती टाकणारे तसेच उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक व आस्थापनांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनधिकृत पाणी कनेक्शन, अनाधिकृत मोटर जोडणे शोधून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. पाणीपट्टी थकबाकी वसुली तसेच अनधिकृत पाणी कनेक्शनवरील दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून आतापर्यंत ८६ लाख 56 हजार रुपयांची वसुली केल्याबद्दल आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी संबंधित पथकाचे अभिनंदन केले. तसेच प्लास्टिक वापर, थुंकणे, उघड्यावर लघुशंका, धूम्रपान, रस्त्यावर खरमाती टाकणे आणि उघड्यावर कचरा टाकणे यांसारख्या प्रकारांविरोधात केलेल्या कारवाईतून १३ लाख 62 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याबद्दल संबंधित पथकाचेही त्यांनी कौतुक केले. या दोन्ही पथकांनी मिळून आतापर्यंत सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक वसुली केली आहे.
शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये सातत्याने प्रबोधन व जनजागृती करण्यात यावी. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना आयुक्तांनी यावेळी या पथकाला दिल्या. घरफाळा, इस्टेट व नगररचना विभागाची वसूली अधिक तीव्र करण्यासाठी नवीन 7 पथके नियुक्त करण्याच्या सूचना उप-आयुक्तांना यावेळी दिल्या. ग्रामीण भागातील अनधिकृत पाणी कनेक्शन अधिकृत करण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करावेत.
संबंधितांकडून नियमानुसार दंडात्मक रक्कम वसूल करून अधिकृत पाणी कनेक्शन करण्यात यावे. महापालिकेच्या विविध सेवा व सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘माय केएमसी’ ॲपचा प्रभावी वापर करून जनजागृती करावी. पाणीपट्टी वसुलीसाठी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना डिजीटल मशीन उपलब्ध करून देऊन क्यूआर कोड तसेच रोख स्वरूपात जागेवरच वसुली करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. यासाठी सर्व मिटर रिडरना सदचे मशीन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सिस्टीम मॅनेजरांना दिल्या. तसेच सर्व मीटर रिडरांच्या बदल्या करण्याच्या सूचनाही आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी उपआयुक्तांना दिल्या.
शहराच्या विकासासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वसुली, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि अनधिकृत कनेक्शनविरोधी मोहिमांना नागरिकांनी सहकार्य करावे. ‘आता स्वतःसाठी नव्हे, तर शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन उपद्रव शोध पथकामार्फत करण्यात आले.
यावेळी उपआयुक्त परितोष कंकाळ, नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह राजपूत, उपद्रव शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.