कागलमध्ये अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ
schedule27 Sep 26 person by visibility 150 categoryगुन्हे
कागल : येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीने आज दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही तरुणी कागल शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरातील सदस्य आणि बाहेरून आलेल्या एका तरुणादरम्यान वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यादरम्यान, तरुणीने घरात गेल्यानंतर काही वेळातच गळफास लावून आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. सुरुवातीला मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी कागल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता, परंतु नातेवाईकांनी अधिक तपासणीची मागणी केल्यानंतर तो सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तींचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच आत्महत्येचे खरे कारण समोर येणार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आणि नातेवाईकांचा रोषही पाहायला मिळाला.