गुरु आणि शिष्यामध्ये ‘सह-अध्यायी’ भूमिका अत्यावश्यक : डॉ. कृष्णा पाटील
schedule15 Jul 25 person by visibility 187 categoryसामाजिक

कोल्हापूर : “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये गुरु आणि शिष्य यांच्या नात्याला विशेष महत्त्व देण्यात आले असून, दोघांमध्ये ‘सह-अध्यायी भूमिका’ अत्यंत गरजेची आहे,” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले.
‘बदलत्या शैक्षणिक धोरणात गुरुचे स्वरूप’ या विषयावर केंद्राच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित ऑनलाईन विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दूर व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव व्ही. बी. शिंदे होते.
डॉ. पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती यामध्ये शिक्षक हा एक मुख्य स्तंभ मानला आहे. भारतीय ज्ञानप्रणालीमध्ये गुरुची भूमिका केवळ ज्ञानदाते म्हणून नव्हे, तर जीवनदृष्टी देणारे मार्गदर्शक म्हणूनही महत्त्वाची आहे. प्रत्येक गुरु हा शिक्षक असतो, पण प्रत्येक शिक्षक गुरु असतोच असे नाही. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे, अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ. गुरु ज्ञान, कौशल्य, अनुभव, वृत्ती, परिपक्वता आणि अभियोग्यता यामुळे मोठा असतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये 'गुण ग्राहकता' म्हणजेच श्रेष्ठ मूल्ये स्वीकारण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. अनुभव, विचार आणि वृत्ती यांच्या समन्वयातूनच खरे 'गुरुपण' घडते.
डॉ. संजय चोपडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नितीन रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सचिन भोसले यांनी आभार मानले.